पुणे: चाकणमध्ये मोबाईलवरून वाद; लाकडी बॅटने ठेचून २४ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या!

पुणे: चाकण परिसरातील वाढत्या गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. दारूच्या नशेत झालेल्या एका किरकोळ वादाचे रूपांतर भीषण हत्येत झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी (दि. ३०) मध्यरात्री चाकणमध्ये एका २४ वर्षीय तरुणाची लाकडी बॅटने बेदम मारहाण करून हत्या करण्यात आली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

काय आहे प्रकरण?
मृत तरुणाचे नाव गोविंद शिवनारायण ढगे (वय २४, मूळ रा. धानोरा खुर्द, ता. आंबेजोगाई, जि. बीड) असे आहे. तो सध्या चाकणमधील आंबेठाण चौक परिसरात राहत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद ढगे मंगळवारी मध्यरात्री मद्यप्राशन करून आरोपी आकाश रवी सोनवणे (वय २५) आणि बुद्धभूषण उर्फ मयूर मुकुंद मोकळे (वय २३, दोघे रा. मलकापूर, जि. बुलढाणा) यांच्या भाड्याच्या खोलीवर गेला होता. आंबेठाण चौकातील संकल्प हॉटेलच्या पाठीमागे त्यांची राहती खोली आहे. तिथे मोबाईल घेण्यावरून गोविंद आणि आरोपींमध्ये वाद झाला.

 

बॅटने ठेचून केली हत्या:
दारूच्या नशेत असलेला हा वाद इतका विकोपाला गेला की, आरोपींनी रागाच्या भरात गोविंदला लाथाबुक्क्यांनी आणि खोलीत असलेल्या लाकडी बॅटने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपींनी गोविंदच्या हात, पाय, छाती आणि डोक्यावर बॅटने सपासप वार केले. या भीषण मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या गोविंदचा जागीच मृत्यू झाला.

या प्रकरणी खाजा जमालउद्दीन शेख (वय २३) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चाकण पोलीस ठाण्यात दोन्ही आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.



शहर

महाराष्ट्र

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *