Beware in Tulshibaug! Woman Robbed of Gold Jewellery Worth Over ₹6 Lakh Amid Crowd; Police Hunt for Thieves via CCTV

सावधान! तुळशीबागेतील गर्दीचा फायदा घेत ६ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला; खरेदी करून घरी परतताच महिलेला बसला धक्का

Beware in Tulshibaug! Woman Robbed of Gold Jewellery Worth Over ₹6 Lakh Amid Crowd; Police Hunt for Thieves via CCTVपुणे:
पुण्यातील सर्वात गजबजलेला व्यापार पेठ असलेल्या तुळशीबाग परिसरात एका ३९ वर्षीय महिलेच्या पर्समधून चोरट्यांनी सव्वा सहा लाखांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. अक्षय तृतीयेच्या खरेदीसाठी झालेल्या गर्दीचा फायदा चोरट्यांनी घेतला असून याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी काय घडली घटना?
तक्रारदार महिला वाघोली परिसरात राहणारी असून त्या १९ एप्रिल रोजी आपल्या नातेवाईकांसह खरेदीसाठी तुळशीबागेत आल्या होत्या. त्यांनी एका नामांकित सराफा दुकानातून ६ लाख २७ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने खरेदी केले. हे दागिने त्यांनी एका छोट्या डब्यात ठेवून तो डबा आपल्या सुरक्षित पर्समध्ये ठेवला होता.

गर्दीचा फायदा आणि चोरी:
अक्षय तृतीयेचा सण असल्याने तुळशीबागेत पाय ठेवायलाही जागा नव्हती. खरेदी करत असताना बँक ऑफ महाराष्ट्राच्या गल्लीत चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत शिताफीने महिलेच्या पर्समधील दागिन्यांचा डबा लंपास केला. धक्कादायक बाब म्हणजे, खरेदी आटोपून महिला जेव्हा घरी पोहोचली आणि पर्स तपासली, तेव्हा त्यांना दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आले.

पोलीस तपास सुरू:
दागिने चोरीला गेल्याचे समजताच महिलेने विश्रामबाग पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून संशयित चोरट्यांच्या टोळ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे.

तुळशीबाग परिसरात खरेदीसाठी जाणाऱ्या नागरिकांनी आपल्या मौल्यवान वस्तू आणि दागिन्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *