Maharashtra Politics: दसऱ्याला नव्या युतीची घोषणा? राज -उद्धव ठाकरे ॲक्शन मोडमध्ये, तातडीची बैठक बोलावली

Mumbai : मुंबईत आज मनसे नेत्यांची महत्त्वाची बैठक होणार आहे. उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर राज ठाकरेंनी ही बैठक बोलावली आहे. दुपारी १ वाजता ही बैठक होणार आहे. या बैठकीत आगामी महापालिका निवडणुकींवर चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी ही बैठक होणार आहे. या बैठकीवर मनसेच्या सर्व नेत्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज ठाकरे यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील महत्वाची बैठक बोलावली आहे. राज ठाकरे यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे यांनी जिल्हा प्रमुखांची बैठक बोलावली आहे. शुक्रवारी शिवसेना ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखांची बैठक होणार आहे. या बैठकीला सर्वांना येण्यास सांगितले आहे. राज ठाकरे यांच्या भेटीदरम्यान आगामी महानगर पालिका निवडणुकांबाबत रणनिती ठरली आहे. त्यानंतर आता दोन्ही नेते आपल्या पक्षाच्या जिल्हाधिकारी आणि पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेत आहेत.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत. यामागचे कारण म्हणजे ठाकरे बंधूंच्या भेटीगाठी वाढल्या आहेत. बुधवारी अडीच तास राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यात बैठक झाली. राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी उद्धव ठाकरेंनी त्यांची भेट घेतली. या भेटीमध्ये महापालिका निवडणुकीबाबत चर्चा झाल्याची माहिती सुत्रांनी दिली.

तब्बल अडीच तास दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये चर्चा झाली. गणेशोत्सवानंतर ठाकरे बंधूंची ही दुसरी भेट होती. संजय राऊत आणि अनिल परब देखील या भेटीवेळी उपस्थित होते. आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेसेना आणि मनसे यांच्यातील संभाव्य युतीबाबत यावेळी दोघांमध्ये चर्चा झाल्याचं सांगण्यात आले होते. तर ठाकरे बंधूंच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. आता दोन्ही नेत्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. त्यामुळे काय रणनिती ठरणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *