Pune : पुणे पोलीस ॲक्शन मोडमध्ये, ड्रग्जविरोधात मोठी मोहीम; विक्रेत्यांसह सेवन करणाऱ्यांवरही कडक कारवाई, थेट मकोका लागू शकतो

Pune : पुणे शहरात वाढत्या ड्रग्जच्या विळख्याविरोधात पुणे पोलिसांनी आता आक्रमक भूमिका घेत ॲक्शन मोड सुरू केला आहे. ड्रग्ज पेडलर्सना थेट इशारा देत “शहरातून ड्रग्ज पूर्णपणे हद्दपार होईपर्यंत आम्ही शांत बसणार नाही,” असा कडक संदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे.

या भूमिकेमुळे शहरातील ड्रग्ज रॅकेटमध्ये खळबळ उडाली असून, पोलिसांनी आपली रणनीतीही बदलली आहे. यापूर्वी साध्या गुन्ह्यांखाली कारवाई होत असताना आता थेट मकोका (MCOCA) अंतर्गत गुन्हे दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे ड्रग्ज विक्रेत्यांसाठी परिस्थिती अधिक गंभीर झाली असून, मकोका लागल्यानंतर जामीन मिळणे कठीण होते आणि दीर्घ काळ तुरुंगवास भोगावा लागू शकतो.

सेवन करणारेही पोलिसांच्या रडारवर
विशेष म्हणजे, केवळ ड्रग्ज विक्रेतेच नव्हे तर ड्रग्ज खरेदी करणारे आणि सेवन करणारेही आता पोलिसांच्या रडारवर आले आहेत. “मजा म्हणून” ड्रग्ज घेणाऱ्यांनाही कायद्याचा फटका बसणार असल्याने तरुणांमध्ये भीतीचे वातावरण आहे. “वेळीच मार्गावर या, अन्यथा अशी कारवाई करू की पुढच्या पिढ्याही लक्षात ठेवतील,” असा इशाराही आयुक्तांनी दिला.

मोठ्या रॅकेटवर पोलिसांचा फोकस
शहरातील काही भागांत ड्रग्ज विक्रीचे जाळे सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. यावर कारवाई करण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून गुप्त माहितीच्या आधारे सापळे रचले जात आहेत. ड्रग्ज नेटवर्कमधील मोठ्या मास्यांपर्यंत पोहोचण्यावर पोलिसांचा भर आहे.

अटक झाल्यास दीर्घ तुरुंगवासाची शक्यता
ड्रग्ज प्रकरणात अटक झाल्यास किमान चार वर्षे तुरुंगातून सुटका होणे कठीण असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे ही मोहीम केवळ इशाऱ्यापुरती मर्यादित नसून प्रत्यक्षात कठोर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

नागरिकांना आवाहन
दरम्यान, ड्रग्जविरोधी लढ्यात नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन पुणे पोलिसांनी केले आहे. ड्रग्जसंदर्भात कोणतीही माहिती असल्यास तात्काळ पोलिसांना कळवावी, असेही सांगण्यात आले आहे.

एकूणच, पुण्यातील ड्रग्जविरोधी लढा आता निर्णायक टप्प्यात पोहोचला असून, येत्या काळात मोठ्या कारवायांची शक्यता व्यक्त केली जात आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *