मुंबई: छळाला कंटाळून सहकलाकार तरुणीची आत्महत्या; एका संशयिताविरोधात गुन्हा दाखल!

मुंबई: विरार पश्चिम येथे ३५ वर्षीय अभिनेत्रीने आयुष्य संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. २७ वर्षीय तरुणाने काम देण्याच्या बहाण्याने तिचे अश्लील व्हिडिओ काढले होते. त्या आधारे तिला ब्लॅकमेल करुन आरोपीने तिच्याकडून १ कोटी रुपये उकळले होते, असे आरोप केला जात आहेत.

सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम
जेपी नगरमध्ये आपल्या आई आणि भावासोबत राहणारी ही तरुणी चित्रपटसृष्टीत ज्युनिअर आर्टिस्ट किंवा सहाय्यक अभिनेत्री म्हणून काम करत होती. गुरुवारी सकाळी ती नेहमीप्रमाणे फिरायला बाहेर पडली होती, मात्र ती बराच वेळ परत न आल्यामुळे शोधाशोध सुरु केली. तेव्हा ओलांडा नाका परिसरात तिचं शव आढळल्याने खळबळ उडाली. या घटनेने तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मृत्यूपूर्वी लिहिलेली चिठ्ठी सापडली
तरुणीने मृत्यूला कवटाळण्याच्या पूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे, ज्यामध्ये तिने छळ आणि ब्लॅकमेल केल्याबद्दल संबंधित आरोपीला जबाबदार धरले आहे.
अभिनयात संधीच्या आमिषाने अश्लील व्हिडिओ
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी सांगितले की, "योगेश म्हापणकर ऊर्फ सौरभ पत्की (वय २७) या आरोपीने तिला अभिनयाच्या संधी मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर त्याने तिचे अश्लील व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि ते व्हायरल करण्याची धमकी दिली."
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १ कोटी रुपये उकळल्यानंतरही आरोपी पैशांची मागणी करत होता. या प्रकरणी खंडणी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला अटक करण्यासाठी शोध मोहीम सुरु केली आहे.

मालेगावात महिला अधिकाऱ्याची आत्महत्या
दुसरीकडे, मालेगाव येथील सहकार निबंधक कार्यालयात महिला अधिकाऱ्याने गळफास घेऊन आयुष्य संपवल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. प्रतिभा दिलीप ठाकरे (वय ५५) असे त्यांचे नाव असून, मालेगाव येथे विशेष लेखापरीक्षक वर्ग २ अधिकारी म्हणून त्या कार्यरत होत्या.

प्रतिभा ठाकरे (रा. आदिनाथ शाळेजवळ, मालेगाव) या गुरुवारी (दि. १५) सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास कार्यालयातील लोखंडी अँगलला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या. महिला शिपाई कामासाठी कार्यालयात आली असता, तिला प्रतिभा ठाकरे यांनी दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. या प्रकरणी कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक विजया पवार करीत आहेत.

दरम्यान, बुधवारी रात्री प्रतिभा ठाकरे यांचे जावई महेश भोये यांच्यासोबत शेवटचे बोलणे झाले होते. ठाकरे यांच्या पश्चात एक मुलगा आणि मुलगी असून, त्यांच्या पतीचे काही वर्षांपूर्वी निधन झाले आहे. मुलगा सातारा जिल्ह्यातील लोनंद येथे खासगी कोचिंग क्लासेस घेतो.



गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *