Nandurbar Accident News : भीषण अपघात; ट्रक-छोटा हत्तीची समोरासमोर धडक; ३ ठार, २ जखमी

प्रकाशा (नंदुरबार) : प्रकाशा गावाजवळ ट्रक व छोटा हत्ती गाडीत समोरासमोर जोरदार धडक होऊन तीन जण जागीच ठार झाले. अपघातातील वृद्ध व दहा वर्षीय मुलाला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी रवाना करण्यात आले. रविवारी (ता. ७) पहाटे साडेपाचच्या सुमारास हा  अपघात झाला.

प्रकाशा (ता. शहादा) जवळ अंकलेश्वर- बऱ्हाणपूर महामार्गावरील राजाराम सुपडू चौधरी यांच्या शेताजवळ शहाद्याहून प्रकाशाकडे येणारा छोटा हत्ती व प्रकाशाकडून शहाद्याकडे जाणारा ट्रक यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली.

त्यात हेमराज अंजनेय हरिजन (वय ३९), मनोज बोखारभाई दाठिया (४२, साईमोहन सोसायटी, बेस्तान, सुरत, गुजरात), तर चालक भगवान गोविंदभाई पंचुले (४८, रा. सचिन गाव, सुरत) तिघे जागीच ठार झाले. गोलूभाई (६५) व अंतिम (१०, पूर्ण नाव, पत्ता समजू शकला नाही) हे जखमी झाले असून, उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात रवाना केले. माहिती कळताच घटनास्थळी पोलिसांसह नागरिकानी धाव घेतली.

जेसीबीच्‍या सहाय्याने काढले बाहेर

या धडकेत दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. अपघाताची  भीषणता एवढी होती, की मृतांना बाहेर काढण्यासाठी जेसीबी मागवावे लागले. पोलिस कर्मचारी तत्काळ दाखल झाल्याने जखमींचा जीव वाचविण्यात यश आले.

दरम्यान, जिल्हा पोलिसप्रमुख पी. आर. पाटील, अपर अधीक्षक नीलेश तांबे, पोलिस उपअधीक्षक संभाजी सावंत, प्रभारी पोलिस निरीक्षक राजन मोरे यांनी घटनास्थळाची पाहणी करत तत्काळ कारवाईचे आदेश दिले. जमादार मेहरसिंग वळवी, हवालदार रामा वळवी, संदीप खंदारे, कृष्णा जाधव यांनी पंचनामा केला. ट्रकचालकाविरुद्ध शहादा पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, पोलिस उपनिरीक्षक अभिजित अहिरे तपास करीत आहेत.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *