जळगाव: "वचपा" रणनीती अन् प्रस्थापितांचे पत्ते कट; जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत भाजप-शिंदे सेनेचे राजकारण चर्चेत

जळगाव: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत महायुतीचे राजकारण चर्चेचा विषय ठरू लागले आहे. जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत अनेक प्रस्थापित आणि दिग्गज संचालकांचे पत्ते कट करण्यात आले असून नव्या चेहऱ्यांना पहिल्यांदाच संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, मागील निवडणुकीत महाविकास आघाडीकडून निवडून आलेल्या बहुतांश संचालकांना यावेळी उमेदवारी नाकारण्यात आली आहे. मागील निवडणुकीत भाजपने घातलेल्या बहिष्काराचा वचपा काढण्यासाठीच महायुतीने ही खेळी खेळल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

भाजपकडून जयश्री सुनील महाजन आणि उद्धवसेनेकडून श्यामकांत सोनवणे हे उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार होते. विशेष म्हणजे, पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आमदार सुरेश भोळे यांचा जयश्री महाजन यांच्याशी राजकीय विरोध सर्वश्रुत आहे. मात्र, या निवडणुकीच्या निमित्ताने जुने मतभेद बाजूला सारत पालकमंत्री पाटील आणि आमदार भोळे यांनी जातीय समीकरण मांडत जयश्री महाजन यांच्या उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न केले.

दोघांनाही उमेदवारी मिळाली नाही

गुलाबराव पाटील आणि जयश्री महाजन यांच्यात झालेल्या चर्चेनुसार, त्यांनी महिला प्रवर्गातून अर्ज कायम ठेवावा आणि तालुका मतदारसंघातून माघार घ्यावी, असा तोडगाही निघाला होता. दुसरीकडे, आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी श्यामकांत सोनवणे यांच्या उमेदवारीसाठी प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र, या दोघांना उमेदवारी मिळू शकली नाही.

मागील बहिष्काराचा काढला वचपा

मागील जिल्हा बँक निवडणुकीत एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे पॅनेल रिंगणात होते. त्यावेळी भाजपने विश्वासघाताचा आरोप करून निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता आणि केवळ संजय सावकारे यांची एकमेव जागा बिनविरोध निवडून आणली होती. त्याच घटनेचा वचपा म्हणून या निवडणुकीत भाजपने मागील वेळी मविआसोबत असलेल्या सर्वच संचालकांचा पत्ता कापल्याचे बोलले जात आहे.

दिग्गजांची भाऊगर्दी बाजूला

या निवडणुकीत अनेक मातब्बर संचालकांना घरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. यामध्ये प्रदीप देशमुख, डॉ. सतीश पाटील, मेहताबसिंग नाईक, प्रताप हरी पाटील, घनश्याम अग्रवाल, जयश्री महाजन, श्यामकांत सोनवणे यांचा समावेश आहे. केवळ आमदार किशोर पाटील, अमोल पाटील, गुलाबराव देवकर, संजय पवार यांच्याच कुटुंबात उमेदवारी दिली असून, इतर सर्वच जुन्या चेहऱ्यांना डावलण्यात आले आहे.

उत्तर महाराष्ट्रातील सहकार क्षेत्रात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीला विशेष महत्त्व मानले जाते आणि या माध्यमातून ग्रामीण व कृषी अर्थकारणावर मोठा प्रभाव राहतो. जळगाव जिल्हा बँकेच्या यंदाच्या निवडणुकीत जागावाटप, उमेदवारी आणि राजकीय समीकरणांवरून महायुतीतील घटक पक्षांमध्ये तसेच स्थानिक नेत्यांमध्ये मोठी खलबते सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

काही नेत्यांमध्ये पूर्वी राजकीय मतभेद व स्पर्धा असूनही, या निवडणुकीच्या निमित्ताने सामाजिक आणि राजकीय समीकरणे जुळवण्यासाठी दिलजमाईचे प्रयत्न करण्यात आले. मात्र, वरिष्ठ पातळीवरील निर्णय आणि बदलेल्या समीकरणांमुळे अनेक प्रबळ दावेदारांची नावे मागे पडली आणि अनेक जुन्या व अनुभवी संचालकांना बाजूला सारून नवीन चेहऱ्यांना पुढे आणण्याची रणनीती अवलंबण्यात आली.

मागील निवडणुकीतील बहिष्काराच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या निवडणुकीत राजकीय हिशेब चुकते करण्याचा आणि सहकार क्षेत्रातील सत्ताकेंद्रांवर आपली पकड मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे राजकीय विश्लेषकांकडून मानले जात आहे. उमेदवारी नाकारल्यामुळे काही नेते व कार्यकर्त्यांमध्ये नाराजीची भावना असली, तरी आगामी टप्प्यातील घडामोडी आणि मतदानाच्या समीकरणांकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

 



राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *