हिंगोली: सणासुदीचा आनंद क्षणात राखेत विरला! हिंगोलीच्या आखाडा बाळापूर बसस्थानक परिसरात भीषण आग; ५ दुकाने बेचिराख, लाखोंचे नुकसान

हिंगोली: दिवाळी सणाच्या उत्साहात संपूर्ण बाजारपेठ उजळून निघालेली असतानाच आखाडा बाळापूर येथील व्यावसायिकांवर निसर्गाचा आणि दुर्दैवाचा मोठा आघात झाला आहे. येथील बसस्थानकासमोरील मुख्य बाजारपेठेतील दुकान लाईनमध्ये गुरुवारी (दि. १२) रात्री ९:३० वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या भीषण आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले; या अग्नितांडवात पाच दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली असून व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे साहित्य अक्षरशः राखेत रूपांतरित झाले आहे. ऐन सणासुदीच्या काळात हाता तोंडाशी आलेला व्यवसाय आणि माल जळून गेल्याने या पाचही व्यापारी कुटुंबांवर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.

पाच दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी; व्यापाऱ्यांचा आक्रोश
आखाडा बाळापूर बसस्थानकासमोर पत्र्याची व पक्की दुकाने एकमेकांना लागून आहेत. रात्री साडेनऊच्या सुमारास या रांगेतील एका दुकानातून धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळा बाहेर पडताना दिसल्या. काही कळण्याच्या आतच आगीने बाजूच्या दुकानांनाही आपल्या कवेत घेतले. यामध्ये पुंजाजी चंद्रवंशी यांचे रेडिमेड कापडाचे दुकान, शेख बबलू यांचे चप्पल व बुटांचे दुकान, नवनाथ शिंदे, आत्माराम महाजन आणि नारायण शिंदे यांची तीन कटिंग सलून दुकाने अशी एकूण पाच दुकाने पूर्णपणे बेचिराख झाली. कापड, चप्पल आणि सलूनमधील महागडे साहित्य ज्वलनशील असल्याने आगीचा भडका मोठ्या प्रमाणावर उडाला होता.

हजारो ग्रामस्थांची धाव; दोन अग्निशमन बंबांनी मिळवले नियंत्रण
आगीची बातमी वाऱ्यासारखी गावात पसरताच हजारो बाळापूरकर घटनास्थळी धावून आले. आखाडा बाळापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मरे, पोलीस उपनिरीक्षक व कर्मचारी प्रशांत शिंदे, विजय जाधव, बेले, नागरगोजे यांच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जमावावर नियंत्रण मिळवले व मदतकार्य सुरू केले. सुरुवातीला कळमनुरी नगरपालिकेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला; मात्र आगीची तीव्रता प्रचंड असल्याने हिंगोली येथून दुसरा बंब पाचारण करण्यात आला. दोन्ही बंब आणि नागरिकांच्या तब्बल दोन तासांच्या अखंड प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली.


शॉर्टसर्किटचा प्राथमिक अंदाज; मदतीची मागणी
रात्रीच्या वेळी दुकाने बंद झाल्यानंतर ही आग नेमकी कशामुळे लागली याचे अधिकृत कारण अद्याप समोर आलेले नाही; मात्र विद्युत तारांमधील शॉर्टसर्किटमुळे ही दुर्घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज प्रत्यक्षदर्शीनी व्यक्त केला आहे. दिवाळीच्या खरेदीसाठी व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर नवीन माल भरला होता. सर्वच भांडवल जळून गेल्याने महसूल प्रशासनाने तातडीने पंचनामे करून या नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांना भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *