छत्रपती संभाजीनगर: मध्यरात्रीचा थरार संजय शिरसाटांच्या घरावर दगड आणि बाटल्याफेक, तिघे तरुण अटकेत

छत्रपती संभाजीनगर: सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या गोलवाडी परिसरातील घरावर काही अज्ञातांनी चालून जात दगड, काचेच्या बाटल्या भिरकावत धिंगाणा घातला. गुरुवारी मध्यरात्री १२ ते १२.३० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यात संशयितांना पकडण्याचा प्रयत्न करताना निवासस्थानी सुरक्षेसाठी तैनात दोन पोलिस जखमी झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री १२ वाजेच्या सुमारास दोन अज्ञात तरुणांनी शिरसाट यांच्या निवासस्थानी जात आत घुसण्याचा प्रयत्न केला. तिथे शिरसाट यांच्या सुरक्षेसाठी तैनात पोलिसांनी त्यांना विरोध केला. सदर तरुणांनी काही वेळातच आरडाओरडा करत बंगल्याच्या दिशेने दगड, बाटल्या भिरकवल्या. त्यांना पकडण्याच्या प्रयत्नात सुरक्षारक्षक व हल्लेखोरात झटापट होत दोन पोलिस किरकोळ जखमी झाल्याचे सांगण्यात आले.

आसपास दारू प्याल्याच्या संशयातून पुढे आला वाद
सूत्रांच्या माहितीनुसार, दोघेही तरुण पालकमंत्री शिरसाट यांच्या बंगल्याच्या मागच्या बाजूला मद्यपान करत होते. त्यामुळे बंगल्यावर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना पहिले हटकले. यातून शाब्दिक वाद वाढत गेला. नंतर दोघांनी मिळून बाटल्या, दगड बंगल्याच्या दिशेने भिरकावले.


दुसऱ्यांदा हल्ल्याची घटना
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. यात दोन संशयित तरुणांना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, घटनेनंतर पालकमंत्री शिरसाट यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत कॉलद्वारे चर्चा केली. विशेष म्हणजे, शिरसाट यांच्या घरावर मध्यरात्री हल्ला होण्याची ही दुसरी वेळ आहे. २१ जुलै रोजी देखील मध्यरात्री घुले नावाच्या तरुणाने शिरसाट यांच्या घरावर हल्ला केला होता.

या घटनेनंतर संजय शिरसाट यांनी पोलीस प्रशासनावर संताप व्यक्त केला. संजय शिरसाट म्हणाले की, "रात्री सुमारे १०:३० ते १०:४५ च्या दरम्यान तीन तरुण माझ्या निवासस्थानाबाहेर आले. ते दारूच्या नशेत असल्याचे दिसत होते आणि त्यांनी तिथे बाटल्या फोडल्या. अनेक ओएसडी आमच्या खिशात आहेत, अशी धमकी त्यांनी सुरक्षारक्षकांना दिली आणि घराच्या दिशेने धावून जात हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मला त्या तरुणांबद्दल काही म्हणायचे नाही, कारण ते कदाचित नशेत असतील किंवा कोणीतरी त्यांना चिथावणी दिली असेल. पण मुख्य प्रश्न हा आहे की पोलीस काय करत आहेत? पोलीस आयुक्तांचा फोन बंद आहे आणि एकही डीसीपी किंवा एसीपी तिथे नाही. एका पालकमंत्र्यांच्या निवासस्थानावर हल्ला होत आहे, तरीही पोलिसांनी किमान याची दखल तरी घ्यायला हवी."



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *