नंदुरबार: खेळता खेळता एरंडीच्या बिया खाल्ल्याने एकाच कुटुंबातील आठ चिमुकल्यांना विषबाधा, एका बालिकेचा मृत्यू

नंदुरबार: धडगाव तालुक्यातील दुर्गम भागातील मोडलगाव येथे चिमुकल्यांनी शेताच्या बांधावर खेळताना अज्ञानापोटी एरंडीच्या बिया खाल्ल्याने एकाच कुटुंबातील आठ बालकांना विषबाधा झाली आहे. या दुर्दैवी घटनेत चार वर्षीय बालिकेचा मृत्यू झाला असून, एका बालकाची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

दुर्दैवाची बाब म्हणजे पोटाची खळगी भरण्यासाठी या बालकांचे आई वडील रोजगाराच्या शोधात इतर जिल्ह्यात मजुरीसाठी स्थलांतरित झाले आहेत. ही सर्व चिमुकली मुले गावात त्यांच्या वयोवृद्ध आजी-आजोबांच्या आधारावर होती.

मिळालेल्या माहिती नुसार, आजोबा गुरे चारण्यासाठी गेले असता, ही भावंडे शेताच्या बांधावर खेळत होती. खेळता खेळता तिथे असलेल्या एरंडीच्या झाडाच्या बिया त्यांनी खाल्ल्या. थोड्याच वेळात या सर्व मुलांना विषबाधेचा तीव्र त्रास सुरू झाला.
हा प्रकार लक्षात येताच गावकऱ्यांच्या मदतीने सर्व आठही बालकांना तातडीने धडगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. विषबाधा झालेल्यांमध्ये पाच मुले आणि तीन मुलींचा समावेश आहे. मात्र, उपचारादरम्यान चार वर्षीय निर्मला बिज्या वळवी या चिमुकलीची प्राणज्योत मालवली. एका बालकाची प्रकृती अधिकच खालावल्याने त्याला तातडीने नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर इतर सहा बालकांवर धडगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रोजगारासाठी आई-वडील बाहेरगावी गेल्यावर मागे राहिलेल्या बालकांच्या सुरक्षेचा प्रश्न या घटनेने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. एकाच कुटुंबातील आठ कोवळ्या जिवांवर ओढवलेल्या या प्रसंगामुळे मोडलगावसह संपूर्ण जिल्ह्यातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
विषबाधा झालेली बालके
१. सुंदर कुवरसिंग वळवी (वय ३ वर्षे)
२. विवेक पिंट्या वळवी (वय ४ वर्षे)
३. जिंता सुभाष वळवी (वय ३.५ वर्षे)
४. विकी धनवरसिंग पाडवी (वय ३ वर्षे)
५. किरण सुभाष वळवी (वय २.५ वर्षे)
६. मनोज बिज्या वळवी (वय ५ वर्षे)
७. पंकिता इसऱ्या पवार (वय ४ वर्षे)

दुर्दैवी मृत्यू झालेली बालिका
८. निर्मला बिज्या वळवी (वय ४ वर्षे)



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *