रत्नागिरी: महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! कोकणातील गुहागर, लाडघर आणि श्रीवर्धन समुद्रकिनाऱ्यांना मिळाला आंतरराष्ट्रीय 'ब्ल्यू फ्लॅग' पुरस्कार!

रत्नागिरी:  महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्रासाठी आणि किनारपट्टीच्या विकासासाठी एक अत्यंत अभिमानास्पद आणि ऐतिहासिक बातमी समोर आली आहे. देशातील आणि राज्याच्या पर्यटन विकासाला नवी दिशा देणाऱ्या कोकणातील तीन प्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठेचा 'ब्ल्यू फ्लॅग' (Blue Flag) पुरस्कार जाहीर झाला आहे. डेन्मार्क येथील प्रतिष्ठित 'फाउंडेशन फॉर एन्व्हायर्नमेंटल एज्युकेशन' (FEE) या आंतरराष्ट्रीय संस्थेमार्फत २०२६-२७ या हंगामासाठी हा बहुमानाचा पुरस्कार देण्यात आला आहे.

नॅशनल ब्लू फ्लॅग ऑपरेटर डॉ. श्रीजी कुरूप यांनी दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर (Guhagar) आणि लाडघर (Ladghar) तसेच रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन (Shrivardhan) या तीन सुंदर समुद्रकिनाऱ्यांची निवड आंतरराष्ट्रीय 'ब्ल्यू फ्लॅग' मानांकनासाठी करण्यात आली आहे. महाराष्ट्राला प्रथमच आंतरराष्ट्रीय स्तरावर हे मानांकन मिळाले असून, यामुळे राज्याच्या किनारपट्टीचे सौंदर्य आणि येथील स्वच्छता जागतिक स्तरावर पोहोचली आहे.

'ब्ल्यू फ्लॅग' हा जगभरात अत्यंत कठोर निकषांच्या आधारे दिला जाणारा पर्यावरणपूरक समुद्रकिनाऱ्यांसाठीचा सर्वोच्च आंतरराष्ट्रीय दर्जा मानला जातो. या पुरस्कारासाठी पर्यटकांची सुरक्षितता, समुद्राच्या पाण्याची उच्च गुणवत्ता, पर्यावरण संवर्धन, सागरी जैवविविधतेचे रक्षण, किनारपट्टीवरील स्वच्छता, पिण्याचे पाणी, उत्कृष्ट पायाभूत सुविधा, आपत्कालीन व्यवस्थापन आणि शाश्वत पर्यटन व्यवस्थापन अशा विविध कडक निकषांवर सर्व किनाऱ्यांची तपासणी केली जाते. या तिन्ही समुद्रकिनाऱ्यांनी हे सर्व आंतरराष्ट्रीय मापदंड यशस्वीरित्या पूर्ण केले आहेत.

या महत्त्वाच्या यशामध्ये राज्य सरकारच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, पर्यटन विभाग, जिल्हा प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था आणि स्थानिक नागरिकांच्या समन्वित व अथक प्रयत्नांचा मोठा वाटा आहे. या तीन समुद्रकिनाऱ्यांचा अधिकृत 'ब्ल्यू फ्लॅग' हंगाम १५ नोव्हेंबर २०२६ पासून सुरू होणार आहे. यासाठी नेदरलँड्समधून विशेष अधिकृत ध्वज मागवण्यात आले आहेत, ज्यांच्या औपचारिक हस्तांतरणानंतर आणि ध्वजारोहण सोहळ्यानंतर हा हंगाम अधिकृतपणे सुरू होईल.

या ऐतिहासिक यशाबद्दल आनंद व्यक्त करताना पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या की, "लाडघर, गुहागर आणि श्रीवर्धन या तीन समुद्रकिनाऱ्यांना आंतरराष्ट्रीय 'ब्ल्यू फ्लॅग' पुरस्कार मिळणे ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे. पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि शाश्वत पर्यटन यांच्यातील योग्य समतोल राखत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली शासन सातत्याने काम करत आहे. या जागतिक मान्यतेमुळे महाराष्ट्राची किनारपट्टी जागतिक पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे झळकणार असून, यामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती, पर्यटन व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळेल. भविष्यात राज्यातील इतर पात्र समुद्रकिनाऱ्यांचा विकासही याच आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे."

तसेच पर्यटन विभागाचे सचिव संजय यादव आणि पर्यटन संचालनालयाचे संचालक विकास पानसरे यांनीही या कामगिरीवर मनोगत व्यक्त करताना सांगितले की, पर्यावरण संरक्षण आणि पर्यटन विकास यांचा उत्तम समन्वय साधत महाराष्ट्रात शाश्वत पर्यटनाला प्रोत्साहन दिले जात आहे. या मानांकनामुळे देशांतर्गतच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पर्यटकांचा ओढा कोकणाकडे वाढेल आणि राज्याच्या किनारपट्टी पर्यटनाला एक नवीन जागतिक ओळख निर्माण होईल.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *