एन. रघुरामन यांचा कॉलम:कुटुंबाचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचे सर्वोत्तम माध्यम म्हणजे सण

सणांचे हे 1 अनोखे वैशिष्ट्य असते की ते पिढ्यान‌्पिढ्या आपला प्रवास करत राहतात. सजावटीचे स्वरूप बदलू शकते, खानपान पूर्वीपेक्षा अधिक आरोग्यदायी होऊ शकते आणि उत्सव साजरे करण्याच्या पद्धतींमध्ये काटकसर येऊ शकते, परंतु या सर्वांशी जोडलेल्या भावना तशाच राहतात. प्रत्येक पिढी पुढच्या पिढीला खास वाटेल असा मार्ग शोधून काढते. आणि बहुधा कुटुंबातील महिलाच हे सुनिश्चित करतात की आठवणी आणि परंपरांची ही साखळी कधीही तुटू नये. मी माझ्याच कुटुंबात 3 पिढ्यांच्या काळात हा सिलसिला पाहिला आहे- माझी आजी, माझी आई आणि आता माझी पत्नी. माझी आजी त्या काळातील होती, जेव्हा सण घराच्या क्षमतेनुसार साजरे केले जायचे. लहानपणापासूनच मी कुटुंबाचा 1 वारसा पाहिला आहे- हंडा. हे जुन्या काळातील तांब्याचे 1 भांडे आहे, ज्याला दिवाळीच्या 1 संध्याकाळ आधीच भरपूर राख आणि भिजवलेल्या चिंचेने घासून चकचकीत केले जायचे. यावर कच्च्या तांदळाच्या पिठाने पांढऱ्या रंगात सूर्य आणि चंद्राची शुभ चिन्हे काढली जातात. हंड्याला फुलांची माळही घातली जाते. असे असले तरी, अनेक वर्षे लाकूड जाळून स्वयंपाक केल्यामुळे त्याच्या खालच्या भागावर आजही काळोखी साचलेली आहे. संपूर्ण कुटुंबातील लोक त्याच हंड्यात कडुलिंबाची पाने टाकून उकळलेल्या गरम पाण्याने आंघोळ करतात. दिवाळीची तयारी, त्या अनुषंगाने होणारे धार्मिक विधी आणि उत्सवाचा उत्साह- या सर्व त्या परंपरा होत्या, ज्या माझ्या आजीला तिच्या वडीलधाऱ्यांकडून वारशाने मिळाल्या होत्या. तिने संस्कृती किंवा परंपरेवर भाषण देऊन नव्हे, तर सण साजरे करण्याच्या आपल्या पद्धतीतून त्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवल्या. बालपणी मनावर पडलेले ते सुरुवातीचे ठसे हळूहळू आमच्या कौटुंबिक जीवनाचा अविभाज्य भाग बनले. आईने हा वारसा आणखी पुढे नेला. दिवाळी तिच्यासाठी आपल्या मुलांना खास वाटून देण्याची संधी असायची. सणाच्या 4 दिवस आधीच ती स्वयंपाकघराची धुरा सांभाळायची. ती केवळ निरनिराळे पदार्थ आणि मिठाई बनवायची नाही तर माझ्यापासून लपवूनही ठेवायची, जेणेकरून सरप्राइज राहील. माझी बहीण तेव्हा खूप लहान होती, त्यामुळे घरात सुरू असलेल्या सर्व रहस्यमय हालचालींवर हेरगिरी करण्याची मुख्य जबाबदारी माझ्याच खांद्यावर होती. आज हा वारसा माझ्या पत्नीच्या हाती आला आहे. आमची मुलगी न्यूयॉर्कमध्ये राहते, पण अंतराने दिवाळीचे नाते थोडेसुद्धा कमी केलेले नाही. माझी पत्नी पुन्हा स्वयंपाकघरात व्यग्र आहे आणि तिच्यासाठी मिठाई बनवत आहे. मात्र आता या तयारीत 1 नवीन पैलू जोडला गेला आहे. तिला माहीत आहे की नवीन पिढी गोड कमी खाते, त्यामुळे ती चवीशी तडजोड न करता पदार्थांच्या पाककृतीत बदल करते. ती शाश्वततेचीही काळजी घेते, ती इतक्याच प्रमाणात मिठाई बनवते की ती वाया जाऊ नये आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, लांबच्या प्रवासात मिठाई सुरक्षित कशी राहील याची काळजी घेते. मी तिला प्रत्येक वस्तू अतिशय काळजीपूर्वक पॅक करताना पाहतो. 1-1 डब्याची वारंवार तपासणी केली जाते. ती डब्यांच्या दरम्यान सुरक्षेसाठी अतिरिक्त लेअर्स ठेवते, झाकणांची मजबूती तपासते आणि हे सुनिश्चित करते की विमानतळांवरून जाताना आणि प्रवासादरम्यान बॅग इकडे-तिकडे हाताळली गेली तरीही काही सांडणार किंवा पडणार नाही. ज्या मिठाईला बनवण्यासाठी अनेक तास लागले आहेत, तिचे पॅकेजिंगही असे असले पाहिजे की जे कित्येक हजार मैलांचा प्रवास सहन करू शकेल! या संपूर्ण दृश्यात काहीतरी अतिशय मार्मिक आहे. माझ्या आजीने परंपरा पुढे नेल्या, माझ्या आईने तिच्या सरप्राइजद्वारे त्या अविस्मरणीय बनवल्या आणि माझी पत्नी 1 अशा पिढीसाठी त्या प्रासंगिक ठेवण्याचे मार्ग शोधत आहे, जी अगदी वेगळ्याच जगात मोठी होत आहे. पण 1 प्रथा कधीही बदलली नाही- तेलाने केलेली आंघोळ आणि शिकेकाईचा सुगंध. आज आमची मुलगी जरी आमच्यापासून दूर असली, तरी घरातील तो ओळखीचा सुगंध, सणाचा गोडवा आणि प्रत्येक डबा अत्यंत काळजीपूर्वक पॅक करण्यामागे लपलेला स्नेह तिच्यासोबत प्रवास करेल.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *