बुलढाणा: माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या अडचणीत मोठी वाढ शैक्षणिक संस्थांच्या चौकशीसाठी पोलिसांची नोटीस, १९९३ पासूनची मागवली माहिती!

बुलढाणा: जिल्ह्यातील चिखली विधानसभेचे माजी आमदार आणि काँग्रेस नेते राहुल बोंद्रे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. त्यांच्या शैक्षणिक संस्थांच्या चौकशीप्रकरणी पोलिसांनी त्यांना अधिकृत नोटीस बजावली आहे. या नोटिशीद्वारे राहुल बोंद्रे यांच्या १९९३ पासून चालवल्या जाणाऱ्या सर्व शैक्षणिक संस्थांची आणि त्यांच्या निधीची सविस्तर माहिती आगामी १५ दिवसांच्या आत सादर करण्याचे निर्देश पोलिसांनी दिले आहेत. स्वतः राहुल बोंद्रे यांनी सोशल मीडियावर पोस्ट लिहून या कारवाईबाबत व पोलिसांच्या नोटिशीबाबत माहिती दिली आहे.

काय आहेत गंभीर आरोप? राहुल बोंद्रे यांच्या मालकीच्या किंवा नियंत्रणाखाली असलेल्या शैक्षणिक संस्थांवर बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय निधी लाटल्याचा आणि शासकीय जमिनी बळकावल्याचा अत्यंत गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध आधीच तीन विविध गुन्हे दाखल करण्यात आले असून, या प्रकरणात ते सध्या जामिनावर बाहेर आहेत. याच प्रकरणाचा पुढील तपास म्हणून पोलिसांनी आता १९९३ पासूनचा संपूर्ण लेखाजोखा आणि कागदपत्रे मागवून चौकशीचा फास अधिक आवळला आहे.

राजकीय सत्तानाट्य आणि पोलिसांची कारवाई: राहुल बोंद्रे यांनी पोलिसांच्या या नोटिशीमागे सत्ताधाऱ्यांचा राजकीय दबाव असल्याचा थेट आरोप केला आहे. विशेष म्हणजे, साधारण महिनाभरापूर्वी राहुल बोंद्रे हे भारतीय जनता पक्षात (भाजपा) प्रवेश करणार असल्याच्या जोरदार चर्चा होत्या. मात्र, ऐनवेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी स्वतः फोन करून संवाद साधल्यानंतर बोंद्रे यांनी आपला भाजप प्रवेशाचा निर्णय मागे घेतला होता. राहुल गांधींच्या एका फोनमुळे भाजप प्रवेश रद्द केल्याने ते राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चेत आले होते. या राजकीय घडामोडींनंतर लगेचच पोलिसांनी १९९३ पासूनच्या संस्थांची चौकशी सुरू केल्यामुळे या नोटीसीमागे राजकीय सूडबुद्धी आहे की खरोखरच गैरव्यवहार झाला आहे, याबाबत संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात व राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *