पुणे: आमदार सुनील शेळकेंवर पाळत? पुण्यात एकाला ताब्यात घेतलं; २ मोबाईल अन् मोठ्या रोकडमुळे प्रकरणाला नवं वळण!

पुणे: जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) मावळचे आमदार सुनील शेळके आणि माहिती अधिकार (RTI) कार्यकर्ते सुनील रघुनाथ गुजर (रा. पिंपळोली, ता. मावळ, जि. पुणे) यांच्यात शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) मोठा वाद व खडाजंगी घडल्याने राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. आमदार शेळके यांनी गुजर हे आपल्यावर पाळत ठेवत असल्याचा आरोप केला असून, गुजर यांनी आमदार शेळके व त्यांच्या सहकाऱ्यांवर मारहाण केल्याचा गंभीर आरोप केला आहे. याप्रकरणी पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात दोघांकडून परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या असून पोलिसांनी सुनील गुजर यांना ताब्यात घेतले आहे.

आमदार सुनील शेळके यांचे गंभीर आरोप

आमदार सुनील शेळके यांच्या दाव्यानुसार, सुनील गुजर हे गेल्या वर्षभरापासून त्यांच्या हालचालींवर पाळत ठेवून होते. गुजर हे इतरांच्या नावाने आरटीआय अर्ज करून शेळके यांच्याशी संबंधित माहिती मिळवत होते आणि ही गोपनीय माहिती राजकीय विरोधक तसेच गुन्हेगारांपर्यंत पोहोचवत असल्याचा संशय आहे.

शुक्रवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास आमदार शेळके जिल्हाधिकाऱ्यांना भेटण्यासाठी गेले असता तिथे गुजर दिसले. संशय आल्याने त्यांच्या बॅगेची तपासणी केली असता, त्यात आमदारांशी संबंधित महत्त्वाची कागदपत्रे, २ मोबाईल फोन आणि मोठी रोख रक्कम (कॅश) आढळून आली. गुजर हे बोगस आयडी वापरून लोकांना धमकावत असल्याचा आरोपही शेळकेंनी केला असून त्यांच्या मोबाईल कॉल रेकॉर्डची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे.

आरटीआय कार्यकर्ते सुनील गुजर यांचा आरोप

दुसरीकडे, सुनील गुजर यांनी मारहाणीचे गंभीर आरोप केले आहेत. आमदारांच्या खाणींच्या रॉयल्टीसंदर्भातील कथित गैरव्यवहाराबाबत आपण आरटीआयद्वारे माहिती मिळवली होती. याच रागातून जिल्हाधिकारी कार्यालयातील एका खोलीत आपल्याला नेऊन बॅग हिसकावून घेण्यात आली, झडती घेण्यात आली आणि बेदम मारहाण करण्यात आली, असा दावा गुजर यांनी केला आहे. प्रशासकीय अधिकारी आमदारांच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

पोलिसांचा तपास आणि सीसीटीव्ही फुटेज

बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या घटनेनंतर पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेज तपासले. फुटेजमध्ये गुजर यांना एका खोलीत नेले जात असल्याचे दिसत असले तरी, त्यांना कोणतीही मारहाण झाल्याचे उपलब्ध कॅमेऱ्यांत कैद झालेले नाही. ज्या खोलीत मारहाणीचा दावा केला जात आहे तिथे कॅमेरा उपलब्ध नसल्याने मारहाणीचा प्रत्यक्ष पुरावा मिळालेला नाही. पोलिसांनी दोन मोबाईल आणि रोख रक्कम जप्त केली असून दोन्ही बाजूंच्या तक्रारींच्या अनुषंगाने सखोल तपास सुरू आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *