नवी दिल्ली: पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात!; 'लहरा दो तिरंगा' आंदोलनापूर्वी सीजेपी संस्थापक अभिजीत दिपकेंचा मोठा दावा!

नवी दिल्ली:  'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) आणि दिल्ली पोलीस यांच्यातील संघर्ष शिगेला पोहोचला आहे. सीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके (Abhijeet Dipke) यांनी दिल्लीतील ऐतिहासिक कनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कवर १६ ऑक्टोबर २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेल्या 'लहरा दो तिरंगा' (Lehra Do Tiranga) आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर एक खळबळजनक दावा केला आहे. "दिल्ली पोलीस मला कोणत्याही क्षणी अटक करू शकतात," अशी भीती आणि शक्यता दीपके यांनी वर्तवली आहे.

आंदोलनाची पार्श्वभूमी आणि जंतर-मंतरवरील कारवाई

काही दिवसांपूर्वी जंतर-मंतर येथे निदर्शने करणाऱ्या सीजेपीच्या प्रमुख कार्यकर्त्यांना सौरव दास आणि आशुतोष रांका यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेऊन पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. जंतर-मंतरवर आंदोलनांना घातलेल्या बंदीनंतर आणि सहकाऱ्यांवर झालेल्या अटकेच्या कारवाईनंतर, अभिजीत दीपके यांनी या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला.

"राष्ट्रध्वज म्हणजेच तिरंगा फडकवणे हा कोणताही गुन्हा नाही. सौरव आणि आशुतोष यांना केवळ तिरंगा हातात धरल्यामुळे तुरुंगात टाकण्यात आले आहे," असा संताप व्यक्त करत दीपके यांनी १६ ऑक्टोबरला देशभरातील लोकांना दिल्लीतील सेंट्रल पार्क येथे सायंकाळी ५ वाजता राष्ट्रध्वजासह एकत्र येण्याचे आणि 'लहरा दो तिरंगा' आंदोलन करण्याचे आवाहन केले. तसेच, ज्यांना दिल्लीला येणे शक्य नाही त्यांनी आपापल्या शहरात तिरंगा मार्च काढण्याचे आवाहन त्यांनी केले.

उच्च न्यायालयाची याचिका आणि दिल्ली पोलिसांचे आश्वासन

दीपके यांच्या या आंदोलनाला रोखण्यासाठी आणि कनॉट प्लेस परिसरातील व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचे कारण देत दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, उच्च न्यायालयाने या आंदोलनावर थेट कोणतीही बंदी घालण्यास नकार दिला. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी उच्च न्यायालयात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि सुरक्षा निश्चित करण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जातील असे आश्वासन दिले.

दिल्ली पोलिसांच्या या तयारीच्या आणि कडक बंदोबस्ताच्या पार्श्वभूमीवर बोलताना अभिजीत दीपके म्हणाले, "मला पोलीस कोणत्याही क्षणी अटक करू शकतात. मात्र, मला त्याची कोणतीही चिंता नाही. तिरंगा हा आमचा अभिमान आहे आणि तो फडकवण्याचा आमचा हक्क आम्ही सोडणार नाही." या प्रकरणामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण आणि सुरक्षेचा मुद्दा चांगलाच तापला आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *