ऊस कर्नाटकात गेल्यास महाराष्ट्राचे मोठे नुकसान होईल"; साखर कारखाने बंद न करण्याचे मुख्यमंत्र्यांचे शेतकरी व आंदोलकांना आवाहन

पुणे: राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. जर महाराष्ट्रातील उसाची वाहतूक किंवा गाळप लांबले आणि इकडचा ऊस शेजारील कर्नाटक राज्यातील कारखान्यांकडे गेला, तर त्यामुळे महाराष्ट्रातील साखर उद्योग आणि पर्यायाने राज्याचे मोठे आर्थिक नुकसान होईल, असा गंभीर इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. त्यामुळे शेतकरी संघटनांनी व आंदोलकांनी कारखाने बंद पाडण्याऐवजी सहकार्य करावे आणि कारखाने वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

सध्या चालू गळीत हंगामाच्या तोंडावर ऊसदराच्या प्रश्नावरून आणि विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आक्रमक भूमिका घेतली असून अनेक ठिकाणी कारखाने बंद पाडण्याचे आंदोलन सुरू आहे. यावर बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, यावर्षी राज्यामध्ये उसाचे उत्पादन अपेक्षेपेक्षा काहीसे कमी झाले आहे, ज्यामुळे गळीत हंगाम कमी दिवसांचा चालण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जर महाराष्ट्रातील कारखाने उशिरा सुरू झाले किंवा आंदोलनामुळे बंद राहिले, तर महाराष्ट्राच्या हद्दीवरील शेतकऱ्यांचा ऊस शेजारील कर्नाटकातील साखर कारखाने पळवून नेतील. याचा थेट फटका महाराष्ट्रातील कारखानदारांना आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना बसेल.

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मदतीची घोषणा:

याचबरोबर, राज्यातील वाढत्या दुष्काळी परिस्थितीवर भाष्य करताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, राज्यामध्ये आधीच २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला होता, मात्र आता परिस्थितीची तीव्रता पाहता ही संख्या वाढवून ३०५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी व त्यांची दिवाळी गोड करण्यासाठी शासनाकडून ५,००० रुपयांची आगाऊ मदत तात्काळ बँक खात्यात जमा करण्यात येत आहे. कोणत्याही तांत्रिक कारणांमुळे पात्र शेतकरी या मदतीपासून वंचित राहणार नाही, याची पूर्ण दक्षता प्रशासनाकडून घेतली जात असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *