पुणे: कार्ला येथील एकविरा देवी मंदिर पार्किंग परिसरात आढळला साडेनऊ फूट लांब अजगर; सर्पमित्रांनी सुरक्षितपणे जंगलात सोडले!

पुणे: प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कार्ला येथील श्री एकविरा देवी मंदिर परिसरातील पार्किंगमध्ये तब्बल ९.६ फूट लांबीचा अजगर आढळून आल्याने भाविक आणि स्थानिक नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. मात्र, 'वन्यजीव रक्षक मावळ' संस्थेच्या सर्पमित्रांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे या अजगराला सुरक्षितरीत्या पकडून नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणालाही इजा झाली नाही.


८ सप्टेंबर रोजी एकविरा मंदिर पार्किंग परिसरात भाविकांची नेहमीप्रमाणे वर्दळ सुरू असताना एका कोपऱ्यात हा भलामोठा अजगर नागरिकांच्या दृष्टीस पडला. एवढा मोठा अजगर पाहताच उपस्थितांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत तात्काळ वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य संभाजी भानुसघरे आणि संजय येवले यांच्याशी संपर्क साधला. घटनेचे गांभीर्य ओळखून दोघांनीही क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी धाव घेतली.
गर्दी आणि गोंधळाचे वातावरण असतानाही सर्पमित्रांनी अत्यंत कौशल्याने अवघ्या काही वेळातच या अजगराला कोणतीही दुखापत न पोहोचवता शिताफीने ताब्यात घेतले. त्यानंतर संस्थेचे संस्थापक नीलेश गराडे आणि वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली तपासणी करून अजगराला सुखरूपपणे त्याच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.


पावसाळ्यात सतर्कतेचे आवाहन पावसाळ्यात डोंगरभागात सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढतो. या पार्श्वभूमीवर संस्थेचे वन्यजीव जीवशास्त्रज्ञ रौनक खरे यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, साप किंवा अजगर दिसल्यास घाबरून जाऊन त्याला मारण्याचा प्रयत्न करू नये किंवा गर्दी करू नये. अजगर बिनविषारी असला तरी स्वसंरक्षणासाठी चावू शकतो किंवा विळखा घालू शकतो. त्यामुळे वन्यजीव आढळल्यास तात्काळ स्थानिक सर्पमित्र किंवा वनविभागाशी संपर्क साधावा. मंदिर प्रशासन, नागरिक आणि सर्पमित्रांच्या सतर्कतेमुळे संभाव्य दुर्घटना टळून एका वन्यजीवाचे प्राण वाचले आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *