पुणे: दहीहंडी अन् गणेशोत्सवातील कर्णकर्कश डीजेच्या आवाजाविरोधात नागरिक आक्रमक; शांततेत सण साजरा करण्याची मागणी!

पुणे: हडपसर दहीहंडी अन् गणेशोत्सवासह विविध सार्वजनिक उत्सवांमध्ये शहरांसह उपनगरांत आवाजाची उच्चतम मर्यादा ओलांडणाऱ्या डीजे, स्पीकर व ध्वनीवर्धकांचा वापर गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे ध्वनीप्रदूषणाबरोबरच नागरिकांच्या आरोग्याला धोका उद्भवत असून, काही भागात आवाज सहन न झाल्याने मृत्यू होण्यासारखेही प्रकार उद्भवले आहेत. त्यामुळे डीजेचा आवाज थांबवा, आम्हाला शांततेने सण साजेरे करू द्या, अशी भावना हडपसर, गाडीतळ, माळवाडी, साडेसत्तरा नळी, ससाणे नगर, फुरसुंगी, भेकराई नगर, हांडेवाडी, चिंतामणी नगर परिसरातील नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

हडपसर परिसरातील निवासी भागांमध्ये विविध उत्सवांच्या वेळी मोठ्या क्षमतेचे ध्वनीवर्धक आणि डीजे लावले जातात. या कर्णकर्कश आवाजाचा सर्वाधिक त्रास ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, विद्यार्थी, रुग्ण तसेच हृदयविकार आणि अन्य आजारांनी त्रस्त असलेल्या नागरिकांना होत असल्याची तक्रार करण्यात येत आहे. आज दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होणार असून त्यानंतर काही दिवसांतच गणेशोत्सवाच्या मिरवणुका सुरू होणार आहेत.

या काळात डीजेच्या मोठ्या आवाजामुळे ध्वनीप्रदूषणाची समस्या गंभीर होऊ नये, रात्री दहीहंडी फोडली जाते. मात्र दुपारपासून मोठ्या आवाजात डीजेच्या भिंती धडधडत असतात. त्याचा त्रास स्थानिक नागरिकांना होतोच पण तेथून मार्गस्थ होणाऱ्या वाहनचालकांनाही होतो. मिरवणुकीदरम्यान वा रस्त्यावर साजऱ्या होत असलेल्या उत्सवात अडकलेले अनेक नागरिकांच्या कानावर सहन न होणारा आवाज पडत राहातो. याशिवाय पोलिसांकडून तक्रारदाराचे नाव गोपिनीय ठेवले जात नसल्याने घराच्या दारखिडकी बंद करून शांत राहणे सर्वसामान्य नागरिक पसंत करत आहेत. यासाठी आयोजकांनी आणि मंडळांनी जबाबदारीने वागावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.


गेल्या वर्षी ससाणेनगर परिसरात डीजेच्या मोठ्या आवाजामुळे एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या घटनेच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या दहीहंडी आणि गणेशोत्सवात डीजेच्या आवाजाबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
साहेब, डीजेच्या आवाजावर आणा नियंत्रण 

दहीहंडी उत्सव आणि आगामी गणेशोत्सवातील मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ध्वनीप्रदूषणाच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करावी तसेच आयोजकांनी डीजेच्या आवाजावर नियंत्रण ठेवावे, अशी मागणी हडपसर परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.


"नागरिकांचा दहीहंडी, गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरे केले जावेत. मात्र उत्सवाच्या नावाखाली मोठ्या आवाजात डीजे व ध्वनीवर्धकांचा वापर करून इतर नागरिकांच्या आरोग्याला आणि शांततेला धोका
निर्माण करणे योग्य नाही विलास जाधव, ज्येष्ठ नागरिक

"उत्सव साजरे करण्यास कोणाचाही विरोध नाही. मात्र डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनीप्रदूषण होते. याचा लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि रुग्णांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. दहीहंडी आणि गणेशोत्सव साजरे करताना मंडळांनी इतर नागरिकांच्या आरोग्याचा व शांततेच्या अधिकाराचा विचार करणे आवश्यक आहे. अर्जुन सातव, सामाजिक कार्यकर्ते'

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *