भटके विमुक्त दिन: स्वातंत्र्याची ८० वर्षे उलटली तरी तारेचे कुंपण तुटले पण विकासाची दारे बंदच; भटक्या समाजाचा संघर्ष कायम

अहिल्यानगर: दरवर्षी ३१ ऑगस्ट हा दिवस 'भटके विमुक्त दिन' म्हणून मोठ्या उत्साहात आणि गांभीर्याने साजरा केला जातो. मात्र, देशाला स्वातंत्र्य मिळून तब्बल ८० वर्षे उलटून गेली आहेत, तरीही हा समाज अजूनही विकासाच्या मुख्य प्रवाहापासून मैलोन्मैल दूर आहे. राज्यातील लाखो भटके आणि विमुक्त जाती-जमातींचे बांधव हे शासन व प्रशासनाच्या अनास्था आणि उदासीन धोरणांमुळे विविध शासकीय योजनांच्या लाभापासून वंचित राहत आहेत. आधुनिकीकरण आणि तंत्रज्ञानाच्या युगात त्यांचे पारंपरिक व्यवसाय पूर्णपणे नामशेष होण्याच्या मार्गावर आले आहेत, ज्यामुळे त्यांच्यावर जगण्यासाठी पुन्हा एकदा नवीन रोजगाराच्या शोधातण भटकंती करण्याची वेळ ओढवली आहे.

ब्रिटिश राजवटीच्या काळात या समाजावर गुन्हेगार म्हणून शिक्का मारला गेला होता आणि त्यांना कुंपणात बंदिस्त ठेवण्यात आले होते. स्वातंत्र्यानंतर जरी ते कायदेशीर कुंपणातून मुक्त झाले असले, तरी सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक वास्तवात त्यांच्याभोवती आजही भेदभावाचे तारेचे कुंपण कायम आहे. मूलभूत कागदपत्रे, राहण्यासाठी हक्काचे घर, मुलांना दर्जेदार शिक्षण आणि उपजीविकेसाठी योग्य साधने यांसारख्या साध्या गोष्टींसाठीही या समाजातील लोकांना प्रचंड संघर्ष करावा लागतो आहे.

शासनाकडून भटक्या विमुक्तांच्या कल्याणासाठी विविध योजना कागदावर जाहीर केल्या जातात, परंतु लालफितीचा कारभार, प्रशासकीय उदासिनता आणि कागदपत्रांची किचकट प्रक्रिया यामुळे या योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी अत्यंत धीम्या गतीने होते किंवा कागदावरच राहते. परिणामी, पिढ्यानपिढ्या दारिद्र्यात आयुष्य जगणाऱ्या या घटकांना आजही अज्ञानात आणि संघर्षात जगावे लागत आहे. यासंदर्भात शासनाने तातडीने ठोस धोरण राबवून भटक्या विमुक्त समाजाला खऱ्या अर्थाने विकासाच्या प्रवाहात आणावे, अशी जोरदार मागणी विविध सामाजिक संघटनांकडून होत आहे.



शहर

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *