Miraculous Escape: Woman Lies Still Between Tracks as Train Passes Over Her at Patas Station

काळ आला होता पण वेळ आली नव्हती! पाटस स्थानकावर अंगावरून ट्रेन गेली तरी महिला बचावली; थरारक व्हिडिओ व्हायरल

Miraculous Escape: Woman Lies Still Between Tracks as Train Passes Over Her at Patas Stationपुणे (दौंड): 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय देणारी एक अत्यंत थरारक आणि अंगावर शहारे आणणारी घटना पुणे जिल्ह्यातील पाटस रेल्वे स्थानकावर घडली आहे. रेल्वे रुळ ओलांडताना अचानक समोरून ट्रेन आल्याने एका महिलेने दाखवलेल्या प्रचंड धैर्यामुळे तिचा जीव थोडक्यात वाचला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला रेल्वे स्थानकावर रुळ ओलांडून पलीकडे जाण्याचा प्रयत्न करत होती. त्याच वेळी भरधाव वेगाने एक मालगाडी त्या रुळावरून आली. समोरून गाडी येत असल्याचे पाहताच महिलेला सुरक्षित जागी धावणे शक्य नव्हते. अशा वेळी घाबरून न जाता त्या महिलेने कमालीचे प्रसंगावधान दाखवले आणि ती दोन रुळांच्या मध्यभागी असलेल्या मोकळ्या जागेत पालथी झोपली.

संपूर्ण ट्रेन या महिलेच्या अंगावरून निघून गेली, तरीही ती महिला शांतपणे तिथेच झोपून राहिली. गाडी निघून गेल्यानंतर ती महिला सुरक्षितपणे उठली. हे दृश्य पाहून स्थानकावरील प्रवासी आणि रेल्वे कर्मचारी थक्क झाले. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, महिलेच्या नशिबाची आणि धैर्याची चर्चा होत आहे.

रेल्वे प्रशासनाने या घटनेनंतर पुन्हा एकदा प्रवाशांना आवाहन केले आहे की, जीव धोक्यात घालून रुळ ओलांडू नये आणि नेहमी पादचारी पुलाचा वापर करावा. या घटनेत सुदैवाने कोणतीही इजा झाली नसली, तरी असे धाडस जीवावर बेतू शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.



विडियो गॅलेरी

2 thoughts on “काळ आला होता पण वेळ आली नव्हती! पाटस स्थानकावर अंगावरून ट्रेन गेली तरी महिला बचावली; थरारक व्हिडिओ व्हायरल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *