रायगड: साडू, मुलाचा दारू कारखाना चालतोय, मग पर्यावरणपूरक 'टोरेंट' प्रकल्पाला विरोध का? आमदार महेंद्र थोरवे यांचा खासदार सुनील तटकारेंवर हल्लाबोल

रायगड: जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील साई डोंगर येथील 'टोरेंट' ऊर्जा प्रकल्पावरून महायुतीमधील राजकारण पुन्हा एकदा तापले असून, शिंदेसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) खासदार सुनील तटकरे यांना थेट सत्तेतून बाहेर पडण्याचा इशारा दिला आहे. या प्रकल्पामुळे रायगडच्या राजकारणात खळबळ उडाली असून दोन्ही पक्षांमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.

कर्जत तालुक्यातील साई डोंगर येथील टोरेंट ऊर्जा प्रकल्पाला राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पासाठी तब्बल ३२ हजारहून अधिक झाडांची कत्तल केली जाणार असल्याचा आरोप करत याविरोधात पर्यावरणप्रेमी आणि विरोधक आक्रमक झाले आहेत. याच मुद्द्यावरून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी प्रकल्पाला कडाडून विरोध केला आहे. यावर तीव्र संताप व्यक्त करत आमदार महेंद्र थोरवे यांनी खासदार सुनील तटकरे यांना लक्ष केले आहे.

खालापूर तालुक्यातील चिखलठण भागात खासदार तटकरे यांचे साडू आणि त्यांचा मुलगा आमदार अनिकेत तटकरे हे दारूचा कारखाना टाकत आहेत, असा गंभीर आरोप आमदार थोरवे यांनी केला आहे. "दारूच्या कारखान्याला तुमचा विरोध नाही, मग हा पर्यावरणपूरक टोरेंट प्रकल्पाला विरोध कशासाठी?" असा सवाल करत थोरवे यांनी तटकरेंना खडेबोल सुनावले आहेत. जर या प्रकल्पाविरोधातील विरोध असेच सुरू राहिले, तर याविरोधात लवकरच तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

काही दिवसांपूर्वीच खासदार सुनील तटकरे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात दिलजमाई झाल्याचे पाहायला मिळाले होते. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतही दोघांमध्ये सौहार्दपूर्ण वातावरण आणि हास्य-विनोद पाहायला मिळाल्यामुळे दोन्ही पक्षांमधील वाद मिटल्याची चर्चा रंगली होती. मात्र, आता या नव्या प्रकरणामुळे तोडगा निघालेला वाद पुन्हा एकदा उफाळून आला असून आगामी काळात दोन्ही पक्षांमधील संघर्ष अधिक विकोपाला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दुसरीकडे, टोरेंट प्रकल्पासाठी सायडोंगर आणि परिसरातील तब्बल २३३ हेक्टर वनजमिनीवरील ३२,४९० झाडे तोडण्याच्या परवानगीविरोधात पर्यावरणप्रेमींनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत जनहित याचिका दाखल केली आहे. मोठ्या प्रमाणावरील या जंगलतोडीचा पर्यावरणावर होणाऱ्या दुष्परिणामांमुळे स्थानिकांमधूनही तीव्र संताप व्यक्त होत असून हा मुद्दा आता राज्यभरात चर्चेचा विषय बनला आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *