अल्पवयीन मुलीच्या प्रकरणावरून गुंज गावात मोठा तणाव; ४२ वर्षीय इसमाला संतप्त जमावाचा चोप, पोलिसांसमोरही उडाला गोंधळ

यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील गुंज गावात एका अल्पवयीन मुलीच्या प्रकरणावरून गुरुवारी अत्यंत तणावपूर्ण आणि धडकी भरवणारी परिस्थिती निर्माण झाली. एका ४२ वर्षीय इसमाने अल्पवयीन विद्यार्थीनीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी अक्षेपार्ह वर्तन केल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. मिळालेल्या माहितीनुसार, शाळेच्या मागील शेतात संबंधित इसम आणि अल्पवयीन मुलगी एका संशयास्पद आणि आक्षेपार्ह स्थितीत आढळले होते. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरताच गावकऱ्यांनी आणि संतप्त पालकांनी घटनास्थळी धाव घेतली.

स्थानिक नागरिकांनी अकबर आझाद पठाण (वय ४२, रा. गुंज) या आरोपी इसमाला रंगेहात पकडले आणि गावकऱ्यांचा रोष इतका तीव्र होता की, त्यांनी त्याला जागीच चोप दिला. या घटनेमुळे गुंज गावात प्रचंड खळबळ उडाली. अवघ्या काही वेळातच संतप्त नागरिकांचा आणि तरुणांचा महाकाय जमाव रस्त्यावर उतरला. गुंज बस स्थानक परिसर आणि मुख्य रस्त्यावर नागरिकांनी मोठी गर्दी करत रस्ता अडवून धरला, ज्यामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. आरोपीवर कठोर कारवाई करावी आणि त्याला आमच्या हवाले करावे, अशी आक्रमक मागणी करत जमावाने पोलिसांच्या दिशेनेही रोष व्यक्त केला.

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून महागाव पोलीस ठाण्याचे पथक आणि अतिरिक्त पोलीस कुमक तातडीने घटनास्थळी दाखल झाली. मात्र, संतप्त जमावाचा आक्रमक पवित्रा पाहून पोलिसांनाही परिस्थिती नियंत्रणात आणताना मोठी कसरत करावी लागली. पोलिसांनी मध्यस्थी करत आरोपीला आपल्या ताब्यात घेतले आणि सुरक्षेच्या कारणास्तव तात्काळ तेथून हलवले. वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळावर तळ ठोकून असून गावात तणावपूर्ण शांतता राखण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पुढील तपास पोलीस करत आहेत.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *