सणासुदीच्या तोंडावर पुण्यात 'एफडीए'चा मोठा दणका; ३ हजार किलोहून अधिक भेसळयुक्त मिठाई जप्त, ८ दुकानांचे परवाने निलंबित!

दिवाळीच्या सणासुदीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या मिठाई उत्पादक आणि विक्रेत्यांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. पुणे विभागअंतर्गत पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर या पाच जिल्ह्यांमध्ये एफडीएच्या विशेष पथकांनी व्यापक तपासणी मोहीम राबवली. या धडक कारवाईदरम्यान तब्बल ३,१९६ किलो वजनाचा संशयित निकृष्ट दर्जाचा आणि भेसळयुक्त खाद्यपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून, त्याची बाजारभावातील किंमत सुमारे १६ लाख ९३ हजार रुपये इतकी आहे. अस्वच्छता, चुकीचे लेबलिंग आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ८ प्रतिष्ठित आस्थापनांचे परवाने तत्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत, तर ३ आस्थापनांना व्यवसाय बंद करण्याचे सक्त आदेश देण्यात आले आहेत.

विविध भागांत धाडी आणि जप्त करण्यात आलेला माल:

एफडीएच्या तपासणी मोहिमेत पुणे आणि लगतच्या परिसरातील अनेक प्रसिद्ध मिठाई व अन्न उत्पादन केंद्रांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला:

  • कोंढवा व धानोरी परिसर: कोंढवा बुद्रुक येथील 'गायत्री लाडू भांडार'मधून १,१८८ किलो मोतीचूर लाडू आणि बुंदी जप्त करून नष्ट करण्यात आली, तसेच धानोरी येथील 'आर. बिकानेर मिठाई केंद्रा'मधून ३०३ किलो संशयित निकृष्ट बर्फी जप्त करण्यात आली.

  • कम्प व इतर दुकाने: पुणे कॅम्प परिसरातील प्रसिद्ध 'कराची स्वीट मार्ट'मध्ये मोतीचूर लाडू, खवा आणि मलाई पेढा असा १८६ किलो साठा अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी जप्त करून परवाना निलंबित करण्यात आला. मोहम्मदवाडीतील 'बिकानेर मिठाईवाले' येथून २६८ किलो बर्फी जप्त करण्यात आली.

  • ग्रामीण भाग व इतर जिल्हे: खेड तालुक्यातील शिरोली येथील 'अंबिका फूड्स' या उत्पादन केंद्रावर छापा टाकून ६४८ किलो संशयित निकृष्ट व चुकीचे लेबल असलेली सोअन पापडी जप्त करण्यात आली आणि केंद्राचा परवाना निलंबित करण्यात आला. तसेच शिक्रापूर येथील 'श्री गणेश लाडूवाले' यांच्याकडून ६०५ किलो म्हैसूर पाक व लाडू जप्त केले गेले. मुळशी तालुक्यातील मान बोडकेवाडी येथील 'चामुंडा माँ रबडीवाला' येथून ४८६ किलो मलाई रबडी व अंगुरी रसगुल्ला जप्त करण्यात आला.

प्रशासनाचा सक्त इशारा आणि आवाहन:

अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड केली जाणार नाही. सणासुदीच्या काळात दर्जेदार आणि सुरक्षित अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी ही मोहीम अशीच सुरू राहणार असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. ग्राहकांनीही मिठाई किंवा खाद्यपदार्थ खरेदी करताना दुकानांची स्वच्छता, अन्नसुरक्षा परवाना आणि उत्पादनावर योग्य लेबल असल्याची खात्री करावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *