एन. रघुरामन यांचा कॉलम:या दिवाळीत फोन बाजूला ठेवा आणि शहराचा नव्याने शोध घ्या

नक्की काय घ्यायचे हे न ठरवता खरेदीला जाण्याचा आनंद वेगळाच असतो. तुम्ही दिवाळीची खरेदी करायला बाहेर पडता. परतताना एखादे नवीन मिठाईचे दुकान सापडते. एखादी अनोळखी गल्ली किंवा सुंदर इमारत दिसते. एखादी रंजक व्यक्ती भेटते. कदाचित एखादा असा मित्र भेटून जातो. त्याची गरज असूनही तुम्हाला त्याची जाणीव नव्हती. पण आता या आनंदाची जागा मोबाइलने घेतली आहे. आज आपण घरात बसून सर्वकाही खरेदी करू शकतो. किमतींची तुलना करतो. लोकांचे अभिप्राय वाचतो. वस्तूंचे व्हिडिओ पाहतो. सवलती तपासून अवघ्या काही क्लिक्समध्ये ऑर्डर देतो. यामुळे आपली ऑनलाइन कार्ट भरते, पण शहराचा प्रत्यक्ष अनुभव सुटून जातो. आठवून पाहा. पूर्वी खरेदी म्हणजे केवळ वस्तू घेणे नव्हते. तो आपला परिसर समजून घेण्याचा भाग होता. उत्तम कपडे कुठे मिळतील, ताजी मिठाई कुठे बनेल आणि चांगले बूट कुठे मिळतील, हे आपल्याला ठाऊक असायचे. खरेदी ही केवळ वस्तू घेण्यापुरती नव्हती. ती जगाशी जोडले जाण्याची एक सुंदर संधी असायची. या दिवाळीत आपण ती सवय पुन्हा जपायला हवी. ऑनलाइन ॲप उघडण्याऐवजी घराबाहेर नजर टाका. कदाचित घराशेजारी एखादे नवीन दुकान दिसेल. हस्तकलेच्या वस्तू विकणारा तरुण व्यावसायिक भेटेल. एखादी जुनी सुंदर वास्तू किंवा अशी गल्ली दिसेल, जिथून तुम्ही रोज जाता पण कधी लक्ष दिले नव्हते. बाजारात जाऊन खरेदी करण्याचे सौंदर्य यातच आहे. ते आपल्याला अशा व्यक्ती आणि जागांशी जोडते. त्यांची शिफारस कोणताही अल्गोरिदम करू शकत नाही. दुकानात गेल्यावर तुम्ही लोकांशी बोलता. प्रश्न विचारता. त्यांच्या गोष्टी ऐकता. एखादी वस्तू खास का आहे हे समजून घेता. कधीकधी एखाद्या कलेचा इतिहासही समजतो. लखनऊचा चिकनकारी विक्रेता, मुंबईचा फुलवाला, मुरादाबादचा पितळ व्यापारी, कोलकात्याचा मिठाईवाला यांच्याशी मारलेल्या गप्पा किंवा चेन्नईत कांजीवरम साडीचे विणकाम पाहणे... या गोष्टी तुम्हाला शहराबद्दल असे काही शिकवतात, जे कोणतेही ॲप शिकवू शकत नाही. दर कमी करताना होणाऱ्या संवादातही एक वेगळीच गंमत असते. ती आपल्याला पैशांचे मूल्य आणि संवादाची कला शिकवते. समोरच्यालाही आपली उपजीविका चालवायची आहे, हे स्वीकारायला शिकवते. याहून महत्त्वाचे म्हणजे बाहेर पडल्याने आपण शहराचे सुजाण नागरिक बनतो. आपण नवीन रस्ते, इमारती आणि उपाहारगृहे पाहतो. नवीन पदार्थांची चव चाखतो. निरनिराळ्या लोकांशी बोलतो. आपले शहर कसे बदलत आहे हे समजते. शहराशी आपले नाते अधिक घट्ट होते. या सवयीला एक मानवी बाजूही आहे. सणासुदीच्या दिवसांत तुमची खरेदी ग्राहकांची वाट पाहणाऱ्या व्यक्तीच्या रोजीरोटीला हातभार लावते. यामुळे पैसा स्थानिक बाजारातच फिरतो. लहान व्यापाऱ्यांना इतरांना रोजगार देणे शक्य होते. अर्थात, ऑनलाइन खरेदीचे स्वतःचे फायदे आहेतच. यामुळे वेळ वाचतो, सोय होते आणि स्थानिक बाजारात न मिळणाऱ्या वस्तू सहज मिळतात. त्यामुळे तंत्रज्ञानाला पूर्णपणे नाकारण्याची गरज नाही. फक्त आपली सोय हीच आपली जगण्याची पद्धत बनू नये, याची काळजी घेतली पाहिजे. चला तर मग, या दिव्यांच्या सणात घरासोबतच शहराशी असलेले नातेही उजळून टाकूया. फोन बाजूला ठेवा आणि बाहेर पडा. या गल्ल्या तुम्हाला कशा थक्क करतात ते पाहा. कुटुंबाला सोबत घ्या. पूर्वी कधी न गेलेल्या बाजारात फेरफटका मारा. छोट्या दुकानातून काहीतरी खरेदी करा. तिथल्या पदार्थांचा आस्वाद घ्या. एखाद्या अनोळखी व्यक्तीला रस्ता विचारा आणि दुकानदाराशी मनमोकळे बोला. कदाचित तुम्ही ठरवल्यापेक्षा कमी वस्तू आणाल, पण ऑनलाइन कार्टपेक्षा कितीतरी पटीने जास्त सुंदर आठवणी घेऊन घरी परताल. फंडा असा की- शहर हे केवळ रस्ते, इमारती आणि बाजारांनी बनत नाही. ते तिथे राहणाऱ्या माणसांनी आणि नात्यांनी बनते. शेवटी, खरेदी करताना आपल्याला सर्वात सुंदर गोष्टी विशिष्ट ठिकाणी भेटतात. वास्तविक आपण त्या शोधायला कधी निघालेलोच नव्हतो!

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *