एन. रघुरामन यांचा कॉलम:कथाकथनात तंत्रज्ञान नव्हे, मानवी नाते अधिक महत्त्वाचे

नेटफ्लिक्सने कथाकथनाची अनेक भागांत आणि सीझन्समध्ये विभागणी सुरू करण्याच्या कित्येक वर्षे आधी माझे आजोबा एक उत्तम कथाकार होते. दररोज रात्री ते आम्हाला एक गोष्ट सांगायचे आणि रामायण ही त्यांची आवडती कथा होती. त्यांचे श्रोते केवळ त्यांची नातवंडेच नव्हते, तर शेजारची मुलेही धावत आमच्या व्हरांड्यात यायची. आजच्या एखाद्या वेबसीरिजच्या दिग्दर्शकाप्रमाणे तेसुद्धा दर रात्री कथा अतिशय रंजक वळणावर संपवायचे. आम्ही पुढची कथा जाणून घेण्यासाठी उत्सुक झालो की ते थांबायचे. श्रीराम आता पुढील संकटाला कसे सामोरे जातील, हनुमान काय करतील किंवा चांगुलपणा आणि वाईटातील लढाई आता कोणते वळण घेईल याच विचारात आम्ही झोपी जायचो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पुढचा भाग ऐकण्याच्या उत्सुकतेने आम्ही परत एकत्र जमायचो आणि अशा रीतीने हे रामायण कित्येक महिने चालायचे. मागे वळून पाहताना समजते की, याने आमच्या मेंदूला ऐकणे, कल्पना करणे, लक्षात ठेवणे आणि पुढे काय घडेल याचा अंदाज बांधणे शिकवले. कोणताही टीव्ही स्क्रीन, स्पेशल इफेक्ट्स किंवा पार्श्वसंगीत नसतानाही ते आम्हाला थेट अयोध्या, वनवासातील जंगले आणि लंकेपर्यंत घेऊन जायचे. आम्ही त्या पात्रांची आणि त्यांच्या आजूबाजूच्या जगाची आपापल्या मनात स्वतःच चित्रे रेखाटायचो. कथा संपल्यानंतरही खूप काळ ती चित्रे आमच्या मनात तशीच जिवंत राहिली. लहानपणी ऐकलेल्या रामायणातील कित्येक गोष्टी मी विसरलो नव्हतो; नंतर चित्रपटांनी हे महाकाव्य पडद्यावर मांडले असले तरीही. चित्रपटांप्रमाणे आजोबांच्या गोष्टीला वेळेचे कोणतेही बंधन नव्हते. ते प्रत्येक पात्राला आणि घटनेला योग्य ते महत्त्व द्यायचे. आज अनेक घरांतून तो आनंद नाहीसा होत चालला आहे. विभक्त कुटुंबपद्धती, कामावरून उशिरा घरी परतणारे पालक आणि टीव्ही व मोबाइल फोनवरील वाढते अवलंबित्व यामुळे अशा सहज-सुंदर परंपरांसाठी वेळ उरलेला नाही. मुलांकडे मनोरंजनाची साधने पूर्वीपेक्षा खूप जास्त आहेत; पण आजी-आजोबांसोबत झोपताना गोष्टी ऐकण्याचा तो अनुभव आता दुर्मिळ होत चालला आहे. कदाचित याच कारणामुळे लखनऊच्या ऐतिहासिक ऐशबाग मैदानावर सुरू असलेल्या रामलीलेचे महत्त्व धार्मिक श्रद्धेपेक्षा कितीतरी पटीने अधिक आहे. कथाकथन वेगवेगळ्या पिढ्यांतील लोकांना एकत्र आणू शकते याची आठवण ही रामलीला आपल्याला करून देते. ऐशबाग रामलीलेची परंपरा 500 वर्षांहून अधिक जुनी आहे. या वर्षी रविवारपासून सुरू झालेल्या आणि 22 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या ‘रामोत्सव-2026’ मध्ये कोलकाता येथील 50 कलाकारांचा चमू रामायण जिवंत करत आहे. कलाकार पारंपरिक कथावाचन, प्रभावी संवाद आणि रंगमंचीय सादरीकरणाच्या माध्यमातून रामायणातील प्रसंग पुन्हा उभे करत आहेत. मात्र आजचा प्रेक्षक अधिक तल्लीन करणारा अनुभव शोधतो, हे आयोजकही जाणतात. म्हणूनच या आयोजनाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे दिल्लीहून आणलेला १२ फूट उंच रोबोटिक हत्ती आहे. एआय-निर्मित दृश्ये आजच्या प्रेक्षकांना आकर्षित करू शकतात. तंत्रज्ञान एखाद्या प्राचीन महाकाव्याचा मूळ भाव न बदलता त्याला नव्या पिढीसाठी नक्कीच रंजक बनवू शकते तरीही ते त्या आत्मीयतेची जागा घेऊ शकत नाही, जी लहान मुलाला झोपताना आजी-आजोबांच्या गोष्ट सांगण्यातून अनुभवायला मिळायची. स्क्रीनवर तीच चित्रे दिसतात, जी इतरांनी आधीच तयार केलेली असतात. कथाकार मात्र मुलाला मनातून स्वतःची चित्रे रंगवण्यास, प्रश्न विचारण्यास आणि कथेतील घटना एकमेकांशी जोडण्यास प्रवृत्त करतो. कथा समजून घेण्यासाठी मुलाला लक्षपूर्वक ऐकावे लागते, पात्रे लक्षात ठेवावी लागतात आणि पुढे काय घडू शकते याचा अंदाज लावावा लागतो. हा सराव छोटा असला तरी लक्ष एकाग्र करणे, कल्पनाशक्ती आणि स्मरणशक्तीसाठी तो अतिशय मोलाचा आहे. कोणतीही गोष्ट ही धैर्य, दयाळूपणा, निष्ठा, मोहाचे क्षण आणि आपल्या निर्णयांचे परिणाम यावर चर्चा करण्याची उत्तम संधी ठरू शकते. फंडा असा आहे की, झोपताना गोष्टी सांगण्याची सवय पुन्हा सुरू करा. पालक किंवा आजी-आजोबांचा केवळ दहा मिनिटांचा आवाजही मुलाची कल्पनाशक्ती, एकाग्रता आणि स्मरणशक्ती समृद्ध करू शकतो. सोबतच अशी मानवी मूल्ये देऊ शकतो, जी कोणताही स्क्रीन कधीच शिकवू शकत नाही.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *