चंद्रपूर: बिबट्याचा थरार; कुत्र्याचा पाठलाग करत घरात शिरला आणि झोपलेल्या पती-पत्नीवर केला हल्ला

चंद्रपूर: मूल तालुक्यातील डोणी गावात रविवारी मध्यरात्री एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना घडली. कुत्र्याचा पाठलाग करत आलेल्या बिबट्याने चक्क घरात शिरून झोपेत असलेल्या पती-पत्नीवर हल्ला केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात आत्माराम शामराव नैताम (४५) आणि त्यांची पत्नी अर्चना आत्माराम नैताम (४२) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

नेमकी घटना काय? रविवारी रात्री बाराच्या सुमारास डोणी गावात बिबट्याचा वावर होता. आत्माराम नैताम यांच्या घराच्या अंगणात एक कुत्रा बसला होता. त्याला शिकार करण्याच्या उद्देशाने बिबट्याने त्याचा पाठलाग सुरू केला. जीवाच्या आकांताने त्या कुत्र्याने थेट नैताम यांच्या घरात धाव घेतली. कुत्र्यामागोमाग बिबट्यानेही घराचा रस्ता धरला आणि तो थेट घरात शिरला.

घरात आत्माराम आणि अर्चना नैताम हे दोघेही गाढ झोपेत होते. अचानक समोर बिबट्या पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. काही कळण्याच्या आतच बिबट्याने दोघांवरही जोरदार झडप घातली. बिबट्याने केलेल्या हल्ल्यात आत्माराम आणि अर्चना यांच्या डोक्यावर, हातावर, पाठीवर आणि शरीराच्या इतर भागांवर बिबट्याच्या नखांचे आणि पंजांचे खोल व्रण पडले आहेत.

ग्रामस्थांच्या मदतीने जीव वाचला बिबट्याच्या अचानक झालेल्या हल्ल्यामुळे घरात एकच गोंधळ उडाला. जखमी दाम्पत्याने आरडाओरडा केल्याने शेजारी आणि इतर ग्रामस्थ तत्काळ मदतीसाठी धावून आले. घराबाहेर लोकांची गर्दी पाहून आणि आरडाओरड्याच्या आवाजामुळे बिबट्या घाबरला आणि घराबाहेर पडून जंगलाच्या दिशेने पळून गेला. यामुळे मोठा अनर्थ टळला.

घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमी दाम्पत्याला तातडीने मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र जखमांचे गांभीर्य पाहता त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण गावात बिबट्याची मोठी दहशत पसरली असून, नागरिक रात्रीच्या वेळी घराबाहेर पडण्यासही घाबरत आहेत. ग्रामस्थांनी वन विभागाकडे परिसरात गस्त वाढवण्याची आणि बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.



राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *