ओटीटीवर दाखल झाला 'खालिद के शिवाजी'; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनोखा प्रवास आता घरबसल्या अनुभवता येणार!

चित्रपटसृष्टी: आपल्या आशयपूर्ण कथेमुळे विशेष चर्चेत राहिलेला ‘खालिद के शिवाजी’ हा चित्रपट आता ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांसह समीक्षकांकडूनही कौतुकाची थाप मिळवल्यानंतर हा चित्रपट आता Apple TV, BookMyShow Stream आणि YouTube Movies या डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध झाला आहे.

त्यामुळे ज्यांना थिएटरमध्ये हा चित्रपट पाहता आला नव्हता, त्यांच्यासाठी आता घरबसल्या हा प्रेरणादायी चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचे आराध्यदैवत नाहीत, तर त्यांच्या विचारांमधून स्वाभिमान, न्याय, समानता आणि माणुसकीचा संदेश आजही समाजाला प्रेरणा देत आहे. याच मूल्यांना केंद्रस्थानी ठेवत ‘खालिद के शिवाजी’ ही कथा उलगडते.

 

धर्म, जात आणि सामाजिक भेदांपलीकडे जाऊन शिवरायांचे विचार प्रत्येकासाठी समान आहेत, हा संदेश चित्रपट अत्यंत संवेदनशील पद्धतीने मांडतो. चित्रपटातील कलाकारांच्याही अभिनयाची विशेष दखल घेण्यात आली आहे. प्रियदर्शन जाधव, भारत गणेशपुरे, सुषमा देशपांडे, कैलास वाघमारे आणि स्नेहलता तागडे यांनी आपल्या भूमिका प्रभावीपणे साकारल्या आहेत. तर मध्यवर्ती 'खालिद'च्या भूमिकेत क्रिश मोरे याने सहज आणि भावनिक अभिनय करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज प्रितम मोरे यांनी केले असून, कथा आणि पटकथा कैलास वाघमारे यांनी लिहिली आहे. मायकल थेवर आणि सुषमा थेवर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

आशयप्रधान आणि सामाजिक संदेश देणाऱ्या या चित्रपटाने चित्रपटगृहांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. आता ओटीटीच्या माध्यमातून हा चित्रपट अधिक व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचणार असून, शिवरायांच्या विचारांचा प्रेरणादायी वारसा नव्या पिढीपर्यंत नेण्याचे काम करणार आहे.
मनोरंजनासोबतच सामाजिक संदेश देणारे चित्रपट पाहण्याची आवड असणाऱ्या प्रेक्षकांसाठी ‘खालिद के शिवाजी’ हा चित्रपट एक उत्तम पर्याय ठरू शकतो.

 



विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *