पुणे: उजनी धरण परिसरातील 'एआय' डेटा सेंटरसह विविध प्रकल्पांना तीव्र विरोध; आमदार रोहित पवार यांचा आंदोलनाचा इशारा"

पुणे: उजनी धरण परिसरात 'सीड' प्रकल्पाच्या माध्यमातून प्रस्तावित 'एआय' डेटा सेंटर, तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प आणि स्मॉल मॉड्युलर रिॲक्टर यांसारख्या विविध प्रकल्पांमुळे पाण्याचा आणि विजेचा बेसुमार वापर होणार आहे. यामुळे भविष्यात मोठी तापमानवाढ, ध्वनिप्रदूषण आणि नैसर्गिक जलचरांच्या अधिवासावर गंभीर दुष्परिणाम होणार आहेत. याच पार्श्वभूमीवर या विनाशकारी प्रकल्पांना आपला कडाडून विरोध असल्याचे स्पष्ट करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एका पत्रकार परिषदेत आक्रमक भूमिका मांडली. या पत्रकार परिषदेस महाराष्ट्र राज्य मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष नंदकुमार नगरे हे देखील उपस्थित होते.

यावेळी सविस्तर माहिती देताना रोहित पवार म्हणाले की, 'सेमीकंडक्टर'सारखे मोठे रोजगार निर्मिती करणारे प्रकल्प जाणीवपूर्वक इतर राज्यांत नेले जात आहेत, तर दुसरीकडे महाराष्ट्राला पाण्याचा अवाजवी वापर करणारे आणि प्रदूषण पसरवणारे डेटा सेंटरसारखे प्रकल्प दिले जात आहेत. उजनी धरणाच्या परिसरात सीड प्रकल्पाच्या माध्यमातून राज्य सरकार, जेएसडब्लू ग्लोबल आणि द सीड कॉन्सोर्टियम पार्टनर्स यांच्यामध्ये तब्बल १ लाख ६५ हजार १५४ कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा करार करण्यात आला आहे. याद्वारे धरणाच्या क्षेत्रात सौरऊर्जा, 'एआय' डेटा सेंटर, ग्रीन हायड्रोजन आणि स्मॉल मॉड्यूलर रिॲक्टर हे चार मोठे प्रकल्प उभारण्याचे नियोजन आहे. या प्रकल्पांसाठी जलसंपदा विभागाची शेकडो एकर जमीन हस्तांतरित केली जाणार असून, यामुळे लाखो शेतकरी आणि मासेमारी करणाऱ्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

येत्या शनिवारी हिंगणगाव येथे या प्रकल्पांविरोधात होणाऱ्या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दिला जाईल, अशी घोषणा त्यांनी केली. उजनी धरणावर दोन लाख हेक्टर शेतीक्षेत्र, पिण्याच्या पाण्याची यंत्रणा, मत्स्यव्यवसाय आणि संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था अवलंबून आहे. मात्र, 'एआय' डेटा सेंटरचे तापमान नियंत्रित करण्यासाठीच किमान नऊ टीएमसी (अब्ज घन फूट) पाणी लागणार आहे, ज्यामुळे पुढील वीस वर्षांत पिण्यासाठी पाणी देखील शिल्लक राहणार नाही, अशी भीती त्यांनी वर्तवली.

तसेच, तरंगत्या सौर प्रकल्पातील पॅनेल्समुळे पाण्याचे तापमान वाढून मासे व इतर जलचरांचा अधिवास धोक्यात येईल. याशिवाय, अणुऊर्जा निर्मितीसाठी प्रस्तावित स्मॉल मॉड्युलर रिॲक्टरमध्ये भविष्यात काही दुर्घटना घडल्यास किरणोत्सर्गाचा धोका निर्माण होऊ शकतो आणि उजनी धरणाची भिंत फुटल्यास संपूर्ण सोलापूर शहर पाण्याखाली जाण्याची मोठी भीती आहे. या प्रकल्पांसाठी लागणारी प्रचंड वीज मिळवण्यासाठी कर्जत-भीमाशंकर परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करून पंप स्टोरेज प्रकल्प उभारले जात आहेत, असा गंभीर आरोपही रोहीत पवार यांनी यावेळी राज्य सरकारवर केला.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *