पुणे: इंदापुरात मोठी दुर्घटना! महामार्गाच्या कामादरम्यान डबराचा ढिगारा कोसळून ६ मजूर अडकले; चौघांची सुखरूप सुटका

पुणे: जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील बिजवडी गावाजवळ राष्ट्रीय महामार्गाच्या पुलाचे काम सुरू असताना भीषण दुर्घटना घडली. कामादरम्यान अचानक डबराचा मोठा ढिगारा कोसळल्याने सहा मजूर ढिगाऱ्याखाली अडकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून, अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे.


मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बिजवडीजवळ राष्ट्रीय महामार्गावरील पुलाचे बांधकाम सुरू होते. याचवेळी अचानक डबराचा ढिगारा कोसळला आणि कामावर असलेले सहा मजूर त्याखाली अडकले. दुर्घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
सहा मजुरांपैकी चौघांची सुटका; दोघांसाठी प्रयत्न सुरू


या दुर्घटनेत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या सहा मजुरांपैकी चार जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे. उर्वरित दोन मजूर अद्याप ढिगाऱ्याखाली अडकले असून, त्यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सुटका करण्यात आलेल्या मजुरांच्या प्रकृतीबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

अंकिता पाटील ठाकरे यांच्याकडून प्रशासनाला सूचना
दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अंकिता पाटील ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली आहे. बिजवडीजवळ महामार्गाच्या कामादरम्यान मातीचा ढिगारा कोसळून काही नागरिक अडकल्याची दुर्दैवी घटना घडल्याचे त्यांनी म्हटले आहे.

तसेच, सर्व संबंधित अधिकारी, सरकारी यंत्रणा आणि आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना तातडीने बचावकार्यात सहकार्य करण्याच्या सूचना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून, अडकलेल्या सर्व नागरिकांची सुखरूप सुटका व्हावी यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.


महामार्गाच्या कामातील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
या दुर्घटनेमुळे महामार्ग आणि पुलांच्या बांधकामादरम्यान मजुरांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, तसेच डबराचा ढिगारा कोसळण्यामागचे नेमके कारण काय, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतर दुर्घटनेचे कारण आणि पुढील तपासाबाबत अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *