पुणेकरांनो लक्ष द्या! संत ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यानिमित्त वाहतुकीत मोठे बदल; ११ ते १५ जुलैदरम्यान 'हे' मार्ग राहतील बंद

पुणे: श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर, पुणे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी वाहतुकीत महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. पालखी मार्गावर भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने ११ ते १५ जुलै २०२६ या कालावधीत काही प्रमुख मार्गांवरील वाहतूक पर्यायी मार्गावर वळवण्यात आली आहे.

 

वाहतूक बदलांचे वेळापत्रक:

  • पुणे ते सासवड मार्ग: ११ जुलै पहाटे २ ते १३ जुलै रात्री १२ पर्यंत, पुण्याकडून सासवडकडे जाणारी दिवेघाट आणि बोपदेव घाटमार्गे होणारी वाहतूक पूर्णपणे बंद असेल. ही वाहतूक खडी मशीन चौक-कात्रज-कापूरहोळ मार्गे वळवण्यात आली आहे. सासवडकडून पुण्याकडे येणारी वाहने गराडे-खेड-शिवापूर मार्गाचा वापर करतील.

  • सासवड ते जेजुरी आणि वाल्हे मार्ग: १३ जुलै पहाटे २ ते १४ जुलै रात्री १२ पर्यंत, पुणे-सासवड-जेजुरी-वाल्हे-निरा आणि निरा-पुणे मार्गावरील वाहतूक झेंडेवाडी-पारगाव मेमाणे-सुपे-मोरगाव-निरा या मार्गाने वळवण्यात येईल.

  • वाल्हे ते लोणंद टप्पा: १५ जुलै रोजी पहाटे २ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत पुणे ते निरा आणि निरा ते पुणे मार्गावरील वाहने सासवड-जेजुरी-मोरगाव या मार्गावरून जातील.

  • लोणंद-फलटण मार्ग: १५ ते १८ जुलै दरम्यान लोणंद-फलटण ते पुणे मार्गावरील वाहतूक शिरवळमार्गे वळवण्यात येणार आहे.

प्रशासनाने नागरिकांना पालखी सोहळ्यादरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्रशासनाने सुचवलेल्या पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *