Biker Attacks Traffic Cop with Helmet and Vandalizes E-Challan Machine in Katraj!

पुणे: पोलिसावर जीवघेणा हल्ला; हेल्मेटने मारहाण करत ई-चलन मशीनची तोडफोड, कात्रजमधील धक्कादायक प्रकार!

Biker Attacks Traffic Cop with Helmet and Vandalizes E-Challan Machine in Katraj!
पुणे: कात्रज परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीस्वाराला रोखणे एका पोलीस कर्मचाऱ्याला चांगलेच महागात पडले. कारवाईचा राग आल्याने संबंधित दुचाकीस्वाराने पोलीस कर्मचाऱ्याला हेल्मेटने मारहाण करत ई-चलन मशीन आणि मोबाईलची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेमकी घटना काय?
ही घटना १८ जून २०२६ रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास कात्रज येथील नवीन पीएमटी बसथांब्याजवळ घडली. भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी येथे तैनात होते. दरम्यान, सदानंद कोंडिबा साळुंखे (वय ४५, रा. वडगाव बुद्रुक, सिंहगड रस्ता) हा आपली दुचाकी (एमएच-१२ डी-क्यू २६५९) भरधाव आणि निष्काळजीपणे चालवत असल्याचे पोलिसांना दिसले.

पोलीस शिपाई पाटणे यांनी त्याला थांबवून वाहनाची कागदपत्रे आणि परवाना मागितला. मात्र, आरोपीने पोलिसांशी वाद घालण्यास सुरुवात केली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून पोलीस शिपाई संतोष बापू खाडे (वय ३६) यांनी हस्तक्षेप केला. खाडे यांनी ई-चलन मशीनद्वारे कारवाई करण्यास सुरुवात केली आणि दुचाकीचे छायाचित्र घेण्याचा प्रयत्न केला.

 

मारहाण आणि तोडफोड
कारवाईचा राग अनावर झाल्याने आरोपी साळुंखे याने पोलीस शिपाई खाडे यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. खाडे यांना हाताने मारहाण केल्यानंतर आरोपीने सरकारी ई-चलन मशीन जमिनीवर फेकून दिली. इतकेच नाही तर, मशीन उचलण्यासाठी वाकलेल्या खाडे यांची कॉलर पकडून, त्याने जवळ असलेल्या हेल्मेटने त्यांच्या डोक्यावर वारंवार मारहाण केली. यावेळी घटनास्थळाचे चित्रीकरण करणाऱ्या पोलीस शिपाई पाटील यांचा मोबाईलही आरोपीने हिसकावून रस्त्यावर फेकून दिला, ज्यामुळे मोबाईलचे नुकसान झाले.

गुन्हा दाखल
या प्रकरणी पोलीस शिपाई संतोष खाडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आंबेगाव पोलिसांनी आरोपी सदानंद साळुंखे याच्यावर भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १३२, १२१(१), ३२४(३), ३५२ आणि २८१ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास आंबेगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शरद झिने आणि पोलीस निरीक्षक (गुन्हे) सजगणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

 



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *