Pune : सतेज पाटील यांचे प्रत्युत्तर, ‘काँग्रेसचा डाऊनफॉल’ म्हणणाऱ्या पार्थ पवारांना ‘वेट अँड वॉच’चा इशारा

Pune : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीतील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खासदार पार्थ पवार यांनी काँग्रेसवर टीका केली होती. यावर प्रतिक्रिया देण्यासाठी पुण्यातील काँग्रेस भवन, शिवाजीनगर येथे आज पत्रकार परिषद घेण्यात आली. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या संघटन सृजन अभियानाअंतर्गत या परिषदेवर आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, काँग्रेस नेते विनोजी सुलतानपुरी, योगेश एच.सी., भाईदास ई. नगराळे आणि सुर्यकांत पाटील उपस्थित होते.

पार्थ पवारांच्या टिकेवर सतेज बंटी पाटील म्हणाले, “खासदार सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आधीच याबाबत उत्तर दिले आहे. काँग्रेसमुळे तुम्ही इथपर्यंत पोहोचले आहात. काँग्रेस किती मोठा पक्ष आहे आणि त्याची परंपरा काय आहे हे सर्वांना माहित आहे. अजून बऱ्याच गोष्टी घडायच्या आहेत; थोडं 'वेट अँड वॉच’,” असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

बारामतीत भाजपने उमेदवार उभा केला नाही. या पार्श्वभूमीवर सतेज पाटील म्हणाले, “भाजपने आम्हाला सांगावं आणि आम्ही त्यांचं ऐकावं, असं नाही. याआधी भाजपने कुठे उमेदवार उभे केले हे सांगायला लावू नका. आम्ही स्वतः निर्णय घेऊ.”

कोल्हापूरच्या कागल येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते समरजित घाटगे यांच्या भाजप प्रवेशाबाबत विचारले असता सतेज पाटील म्हणाले, “भाजपची गाडी एवढी भरली आहे की काहीजण खिडकीला लोमकळत आहेत. ७० जागा वाढणार आहेत, डी-लिमिटेशनबाबत लोकांना माहिती दिली जात आहे. जे लोक भाजपात जात आहेत ते काही अडचणीमुळे जात आहेत; पण जनता आमच्यासोबत आहे.”

दरम्यान, बारामतीतील राजकीय वातावरण सध्या तापलेले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि काँग्रेसकडून आकाश मोरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सतेज पाटील यांनी स्पष्ट केले की, पक्ष माघार घेणार असल्याच्या अफवा चुकीच्या आहेत आणि सर्व निर्णय वरिष्ठ नेत्यांद्वारे घेतले जातील.

पत्रकारांच्या एका प्रश्नावर विनोजी सुलतानपुरी म्हणाले, “संघटन सृजन अभियानाद्वारे प्रत्येक कार्यकर्त्याची मते जाणून घेऊन ही माहिती हायकमांडकडे पाठवली जाईल. मोहीम संपूर्ण विधानसभा मतदारसंघात पार पडेल, आणि त्यानंतर पक्षाची फेररचना केली जाईल.”



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *