Nashik : अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांवर विधीमंडळात मोठा खुलासा होणार; IPS सातपुते यांच्या टीमने आवळला फास!

Nashik : भविष्यातील घटनांची भीती दाखवून महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी अशोक खरात उर्फ कॅप्टनच्या कुकर्मांचा भंडाफोड नाशिकमध्ये गुन्हा नोंद होण्यापूर्वीच झाल्याची माहिती समोर आली आहे. शिर्डी पोलिसांत मॉर्फ व्हिडीओबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर खरातमागे तपासाचा ससेमिरा सुरू झाला. त्यानंतर दाखल झालेल्या गुन्ह्यांप्रकरणी ‘एसआयटी’ने तपासचक्राला वेग दिला आहे. पोलिसांनी पीडितांचा शोध सुरू केला असून, ‘एसआयटी’ने महाराष्ट्र पोलिस अकादमीमध्येही (एमपीए) चौकशीसत्र राबवले.

नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांत २८ वर्षीय पीडित महिलेने १७ मार्चला दिलेल्या फिर्यादीवरून संशयित अशोककुमार खरातविरुद्ध बलात्कारासह जादूटोणाविरोधी कायद्यान्वये गुन्हा नोंद आहे. या प्रकरणी पोलिसांनी शनिवारी खरातची वैद्यकीय तपासणी करून सहा तासांपेक्षा अधिक वेळ कसून चौकशी केली.

शिर्डी पोलिसांत एका पीडितेच्या फिर्यादीवरून अशोक खरातचा ‘ऑफिस बॉय’ नीरज जाधवविरुद्ध फेब्रुवारीच्या अखेरीस गुन्हा नोंद आहे. हा गुन्हा नोंद होताच पोलिस दलाने खरातची ‘कुंडली’ बाहेर काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे १३ मार्चला शिर्डी व वावी पोलिसांत दाखल गुन्ह्यांसाठी ‘एसआयटी’ स्थापन झाली. त्यातच नाशिकमध्ये पीडितेने पुढाकार घेत खरातचे कुकर्म उघड केल्याने हा गुन्हाही ‘एसआयटी’कडे वर्ग करण्यात आला.

‘एसआयटी’ने तपासाबाबत कमालीची गोपनीयता बाळगली आहे. नाशिक पोलिस मुख्यालयातील ‘हिमांशू’ या अतिथीगृहात तपास करण्यासह एमपीए येथेही या प्रकरणाबाबत काही जणांना बोलावून ‘एसआयटी’ने चौकशी सत्र राबविल्याचे सूत्रांनी सांगितले.

शनिवारी काय घडले?

वावी खंडणी प्रकरणातील एका संशयिताला ताब्यात घेतल्याची चर्चा
मंत्री दीपक केसरकर यांचा निकटवर्तीय दीपक लोंढे याला ताब्यात घेतल्याची चर्चा; ‘एसआयटी’चा दुजोरा नाही
‘एसआयटी’मध्ये नाशिक शहर, ग्रामीण व अहिल्यानगरातील महिला पोलिस निरीक्षकांचा समावेश
गोपनीयतेसाठी ‘एसआयटी’मार्फत खासगी वाहनांचा तपासावेळी वापर
‘एसआयटी’ प्रमुख आयपीएस तेजस्वी सातपुते यांना भेटण्यासाठी अहिल्यानगर, शिर्डी, नाशिकमधून ग्रामस्थ पोहोचले
नाशिक शहरातील वरिष्ठ पोलिस अधिकारी ‘एसआयटी’ तपासापासून दूर
प्रकरण १ : खरातकडे खंडणी (२९ डिसेंबर २०२५)

पोलिस ठाणे : वावी (नाशिक ग्रामीण)

फिर्यादी : अशोककुमार खरात उर्फ कॅप्टन

संशयित : दिनेश मनाजी परब (रा. भायखळा, मुंबई) व राजेंद्र अशोक जासुद (रा. पुणे)

हकीकत : परबने खरातला २२ ते २८ डिसेंबर या कालावधीत व्हॉट्सॲपवर संपर्क साधत जासुद याच्याकडे खरातचे काही महिलांसोबतचे आक्षेपार्ह फोटो आहेत, असे सांगितले. समाजात बदनामी करण्याची धमकी देत ‘सेटलमेंट’ करण्यासाठी संशयितांनी पाच कोटी रुपये मागितले. खरातने हे फोटो खोटे असल्याचे सांगून पैसे देण्यास नकार दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

प्रकरण २ : महिलेचा ‘मॉर्फ’ व्हिडीओ (फेब्रुवारी २०२६)

पोलिस ठाणे : शिर्डी (अहिल्यानगर)

फिर्यादी : २४ वर्षीय पीडिता

संशयित : नीरज जाधव व इतर

हकीकत : संशयिताने पीडितेच्या व्हॉट्सॲपवर ‘एआय’द्वारे बनवलेले किंवा ‘मॉर्फ’ केलेले अश्लील फोटो पाठवून व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर पीडितेला एका अनोळखी व्यक्तीने संशयिताकडे तिचे फोटो असल्याचे सांगितले. नीरज हा खरातच्या ऑफिसमध्ये कार्यरत होता. त्याने पीडितेला धमकावल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

प्रकरण ३ : महिलेवर अत्याचार व जादूटोणा (१७ मार्च २०२६)

पोलिस ठाणे : सरकारवाडा (नाशिक शहर)

फिर्यादी : २८ वर्षीय पीडिता

संशयित : अशोककुमार एकनाथ खरात उर्फ कॅप्टन

हकीकत : खरातने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा खोटा दावा करून मंत्र-तंत्र आणि धार्मिक विधींच्या नावाखाली पीडितेचा विश्वास संपादन केला. पीडितेला गुंगीकारक पदार्थ देत तिच्या पतीच्या मृत्यूची भीती घालून आणि जिवे मारण्याची धमकी देत नोव्हेंबर २०२२ ते डिसेंबर २०२५ या कालावधीत वारंवार बलात्कार केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

खरातची कोठडी कशासाठी?

सन २०२२ ते २०२५ या दीर्घ कालावधीत महिलेवर अत्याचार

तपशीलवार तपासाकरिता पोलिस कोठडी आवश्यक

संशयिताने इतरही महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा संशय

संशयिताने वापरलेले गुंगीचे पदार्थ व गुन्ह्यातील वस्तू जप्त करणे

डिजिटल पुरावे, आर्थिक व्यवहार, गुन्ह्यातील इतर संशयितांची माहिती मिळवणे

फॉरेन्सिक पथकाद्वारे घटनास्थळांचा पंचनामा करून भौतिक व सबळ पुरावे संकलित करणे

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *