परभणी: २ वर्षे अनैतिक संबंध, महिलेनं २ अल्पवयीन मुलांच्या मदतीने प्रियकराला संपवलं; परभणीत मध्यरात्री रिक्षाचालकाच्या हत्येचा थरार!

परभणी:  शहरातील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी एका ३२ वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. अंगावर मारहाणीच्या व धारदार शस्त्राच्या गंभीर खुणा असलेल्या या तरुणाला मारहाण करून कॅनॉलमध्ये फेकल्याचे समोर आले होते. या प्रकरणाचा पोलिसांनी सखोल तपास केला असता पूर्वनियोजित आणि क्रूर हत्येचा धक्कादायक उलगडा झाला आहे. मागील दोन वर्षांपासून सुरू असलेल्या अनैतिक संबंधातून आणि त्यातून झालेल्या वादाच्या रागातून ही हत्या झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दर्गा रोड परिसरातील एका संशयित महिलेसह तिच्या दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून, कोतवाली पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

रात्री रिक्षा चालवण्यासाठी गेला अन् सकाळी कॅनॉलमध्ये मृतदेह आढळला

हत्या झालेल्या तरुणाचे नाव शेख युनुस शेख युसुफ (वय ३२, रा. परभणी) असे आहे. मयत युनुस यांच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार, युनुस २४ नोव्हेंबर रोजी रात्री ऑटो रिक्षा चालवण्यासाठी जातो, असे सांगून घराबाहेर पडला होता. मात्र, रात्र उलटूनही तो घरी परतला नाही आणि त्याचा मोबाईल फोनही बंद लागत होता. यामुळे कुटुंबीयांनी घाबरून परिसरात व ओळखीच्या ठिकाणी त्याचा शोध घेतला; परंतु त्याचा काहीच थांगपत्ता लागला नाही. शेवटी कुटुंबीयांनी नानलपेठ पोलीस ठाण्यात युनुस हरवल्याची तक्रार दाखल केली.

दुसऱ्या दिवशी, २५ नोव्हेंबर रोजी सकाळी बलसा खुर्द गावाच्या शिवारातील कॅनॉलमध्ये युनुसचा मृतदेह आणि त्याची ऑटो रिक्षा आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. तपासादरम्यान रिक्षा कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दर्गा परिसरातील कॅनॉलमध्ये आढळून आली होती, तर नवा मोंढा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बलसा शिवारात कॅनॉलच्या पाण्यात मृतदेह तरंगताना आढळला. युनुसच्या डोक्यावर धारदार शस्त्राचे आणि पाठीवर चाकूने वार केल्याचे गंभीर घाव होते. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि तपासाला गती दिली.

महिलेच्या चौकशीतून हत्येचा उलगडा; जखमी अवस्थेतच कॅनॉलमध्ये फेकले

या प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे (LCB) तसेच नानलपेठ व कोतवाली पोलिसांकडून सुरू होता. तपासादरम्यान मयत युनुस याचे एका महिलेसोबत मागील दोन वर्षांपासून अनैतिक संबंध असल्याचे समोर आले. या धाग्यावरून पोलिसांनी दर्गा रोड परिसरातील एका संशयित महिलेला ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता हत्येचा संपूर्ण कट उघड झाला.

मृत युनुससोबतच्या वादाचा राग मनात धरून संबंधित संशयित महिला आणि तिच्या दोन अल्पवयीन मुलांनी संगनमत करून युनुसवर चाकू आणि लोखंडी रॉडने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर जखमी अवस्थेतच आरोपींनी त्याला रिक्षासह कॅनॉलमध्ये फेकून दिले आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती तपासात समोर आली आहे.

तिघेही आरोपी पोलिसांच्या ताब्यात

या संपूर्ण प्रकरणात आरोपी महिला आणि तिच्या दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमान्वये हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला असून, संशयित महिलेसह दोन्ही अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलपत्रेवार यांनी दिली. घटनेतील प्रत्येक पैलूची बारकाईने पडताळणी करून पुढील तपास सुरू आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *