ब्रह्म चेलानी यांचा कॉलम:जगावर वर्चस्व गाजवण्याची स्पर्धा आता तंत्रज्ञानावर येऊन थांबली

गेल्या अनेक वर्षांपासून अमेरिका प्रगत तंत्रज्ञानापर्यंत चीनला पोहोचू न देण्यासाठी कंबर कसून उभी आहे. त्यासाठी अमेरिका निर्यात-नियंत्रणाचा वापर करत आहे. चीनने या उपायांचा वारंवार निषेध केला. आपले तांत्रिक वर्चस्व मजबूत ठेवण्याचा हा अमेरिकेचा उघड प्रयत्न असल्याचे चीनचे म्हणणे आहे. हे बाजारपेठेच्या अर्थव्यवस्थेच्या तत्त्वांच्या विरोधात असल्याचा दावाही चीन करतो. मात्र याच काळात चीननेही प्रत्युत्तर देण्याची क्षमता सातत्याने वाढवली. 2021 मध्ये चीननेही ‘ब्लॉकिंग रूल्स’ जारी केले. परदेशी कायदे आणि निर्बंधांपासून चिनी संस्थांचे संरक्षण करणे, हा यामागचा उद्देश होता. चीनने व्यापार युद्ध लढण्याची क्षमताही वाढवली आणि एकीकृत परवाना व्यवस्था तयार केली. निर्यातीवर व्यापक नियंत्रण ठेवण्याचे चीनचे धोरण हे अमेरिकन मॉडेलवरच आधारित आहे. अमेरिका आपली मोठी बाजारपेठ आणि तांत्रिक नेतृत्वाचा वापर भू-राजकीय उद्दिष्टांसाठी करते. त्याचप्रमाणे चीनही महत्त्वाची खनिजे, औद्योगिक कच्चा माल व विशिष्ट भांडवली वस्तूंवरील आपल्या प्रभुत्वाचा फायदा घेत आहे. पण या उभयांत एक महत्त्वाचा फरक आहे. जागतिक अर्थव्यवस्थेतील चीनचे विशिष्ट स्थान त्याला इतर देशांच्या कमकुवतपणाचा फायदा घेण्यास सक्षम बनवते. तसा अमेरिका घेऊ शकत नाही. दुर्मिळ खनिजांच्या (रेअर-अर्थ) प्रक्रियेवर आणि शुद्धीकरणावर चीनची मक्तेदारी आहे. इतर महत्त्वाच्या खनिजांवरही त्याचे प्रभुत्व आहे. यातून चीनला इलेक्ट्रिक वाहने, पवनचक्क्या, प्रगत इलेक्ट्रॉनिक्स व संरक्षण उत्पादन यांसारख्या अनेक महत्त्वाच्या हाय-टेक उद्योगांवर जबरदस्त दबाव टाकण्याची ताकद मिळते. औद्योगिक यंत्रसामग्रीवरील चीनचे नियंत्रण व जागतिक पुरवठा साखळीतील त्याची मध्यवर्ती भूमिका यामुळेही त्याला दबाव टाकण्याच्या अतिरिक्त संधी मिळतात. ही सर्व चीनच्या भू-आर्थिक शस्त्रागारातील अत्यंत शक्तिशाली शस्त्रे आहेत. एप्रिल 2025 मध्ये चीनने अमेरिकेला होणारी दुर्मिळ खनिजांची बहुतांश निर्यात रोखली होती. त्यामुळे ट्रम्प प्रशासनाला आयात कर वाढवण्याची आपली प्रक्रिया मागे घ्यावी लागली. तसेच व्यापार युद्धविरामावर चर्चा करावी लागली. एकूणच संघर्षाची भूमिका सोडून तडजोडीचा मार्ग स्वीकारावा लागला. पण चीन हे डावपेच केवळ अमेरिकेविरुद्धच वापरत नाहीये. त्याने भारताला होणाऱ्या महत्त्वाच्या खनिजे, उत्पादन उपकरणांच्या, बोगदे खोदणाऱ्या यंत्रांच्या, औद्योगिक सुट्या भागांच्या, बॅटरी तंत्रज्ञानाच्या आणि लिथियम-आयनशी संबंधित कच्च्या मालाच्या निर्यातीवरही निर्बंध लादले आहेत. पर्यायी जागतिक उत्पादन केंद्र म्हणून भारताचा होणारा उदय रोखण्याचा हा प्रयत्न आहे. अशाच प्रकारे चीनने जपानवरही निर्यातीसंबंधी निर्बंध लादले आहेत. यात प्रामुख्याने अशा जपानी कंपन्यांना लक्ष्य केले गेले. त्याचे संबंध संरक्षण उद्योगाशी आहेत. आर्थिक दबाव आणून आपली लष्करी क्षमता मजबूत करण्याचे जपानचे प्रयत्न कमकुवत करणे, हा यामागचा उद्देश आहे. चीन युराेपीय संघासह इतर मोठ्या अर्थव्यवस्थांविरुद्धही आपल्या या आघाडीचा वापर करू शकतो. यामुळे इलेक्ट्रिक वाहनांचे उत्पादन, नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प, संरक्षण उत्पादन आणि पायाभूत सुविधांत गुंतवणुकीवर परिणाम होऊ शकतो. मात्र, हा डाव उलटही पडू शकतो. कारण यामुळे जगभरात चीनच्या औद्योगिक यंत्रणेवरील अवलंबित्व कमी करण्याची स्पर्धा आणखी तीव्र होईल. तसेच विविध देशांची सरकारे अधिक विश्वासार्ह देशांकडे वळण्याचे प्रयत्न वेगाने करतील. मध्यम सत्ताधारी आणि विकसनशील अर्थव्यवस्थांसमोर एकूणच यामुळे अवघड परिस्थिती निर्माण झाली आहे. हे देश केवळ अमेरिका आणि चीनच्या आर्थिक दबावाच्या बाबतीतच संवेदनशील नाहीत, तर या दोन महासत्तांमध्ये होणाऱ्या चर्चेत ते नाहक बळी ठरण्याचा धोकाही आहे. प्रगत तंत्रज्ञानावर केंद्रित असलेली अमेरिका आणि चीनची स्पर्धा आता विस्तारत चालली आहे. ज्या कच्च्या मालावर, यंत्रसामग्रीवर, औद्योगिक प्रक्रियांवर आणि पुरवठा साखळीवर जवळपास प्रत्येक अर्थव्यवस्था अवलंबून आहे, त्यावर नियंत्रण मिळवण्याची ही लढाई बनत आहे. या संघर्षात उर्वरित जगालाच सर्वाधिक नुकसान सहन करावे लागू शकते. © प्रोजेक्ट सिंडिकेट आधुनिक अर्थव्यवस्था कच्च्या मालावर, यंत्रसामग्री, औद्योगिक प्रक्रियांवर आणि पुरवठा साखळीवर अवलंबून आहे. त्यावर नियंत्रणाची ही लढाई बनत चालली आहे. प्रगत तंत्रज्ञानावर केंद्रित असलेली अमेरिका व चीनमधील स्पर्धा आता या नव्या वळणावर येऊन ठेपली.

This post was originally published on this site.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *