गोंदिया: दांडेगाव बसस्थानकाजवळ पोलीस वाहनाची पल्सर दुचाकीला भीषण धडक; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, संतप्त ग्रामस्थांकडून रस्त्यावर टायर जाळून निषेध!

गोंदिया: गंगाझरी पोलीस ठाण्याच्या वाहनाने पल्सर दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत तीन तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची अत्यंत हृदयद्रावक घटना बुधवारी (२५ नोव्हेंबर २०२६) रात्री सुमारे साडेदहाच्या सुमारास दांडेगाव बसस्थानकाजवळ घडली. या भीषण अपघातानंतर परिसरात तीव्र शोककळा पसरली असून, घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर टायर जाळून निषेध नोंदवला. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांविरुद्ध तत्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी ग्रामस्थ व नागरिकांनी केली आहे.

अपघाताचा थरार आणि तिघांचा करुण मृत्यू

गंगाझरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज राजूरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दांडेगाव बसस्थानकाजवळ गंगाझरी पोलीस ठाण्याचे वाहन आणि पल्सर दुचाकी यांच्यात जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की दुचाकीवरील तिन्ही तरुणांना गंभीर मार लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात पोलीस वाहनाचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या भीषण दुर्घटनेत खळबंदा येथील रितेश बावनकर (वय १७), शिवप्रसाद कांबळे (वय १७) आणि तिरोडा तालुक्यातील सेजगाव येथील कार्तिक बिसेन (वय २०) या तीन तरुणांचा मृत्यू झाला आहे. तिघांच्या अकाली मृत्यूची बातमी समजताच त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

ग्रामस्थांचा संताप आणि टायर जाळून निषेध

अपघाताची माहिती मिळताच दांडेगावसह आसपासच्या गावांतील नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी धावून आले. पोलिसांच्या वाहनाने दुचाकीला धडक दिल्याचे समजताच नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला. संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावर टायर पेटवून निषेध व्यक्त केला. संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा, या दुर्घटनेची निष्पक्ष चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास गंगाझरीचे पोलीस निरीक्षक धीरज राजूरकर यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

अपघात की निष्काळजीपणा, याचा तपास महत्त्वाचा!

या दुर्घटनेमुळे पोलीस यंत्रणेच्या वाहन चालवण्याचा आणि जबाबदारीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मात्र, अपघाताची नेमकी कारणे, वाहनांचा वेग, धडकेची परिस्थिती आणि संबंधितांची भूमिका याबाबत अधिकृत सखोल तपासातूनच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. तीन तरुणांचे अकाली मृत्यू ही केवळ एका अपघाताची घटना नसून, निष्पक्ष तपास आणि पारदर्शक कारवाईची अपेक्षा व्यक्त करणारी गंभीर बाब ठरली आहे. परिसरातील तणावाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गंगाझरी पोलीस ठाण्याचे पथक ११२ वरील कॉलवर जात असताना तिरोडाकडून गोंदियाकडे येत असलेल्या दुचाकी वाहनाला धडक लागल्यामुळे सदर अपघात घडल्याची प्राथमिक माहिती पोलीस निरीक्षक धीरज राजूरकर यांनी दिली आहे.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *