स्वच्छ हवेसाठी १७.७५ कोटींचा निधी; तरी कोल्हापूरचा श्वास प्रदूषणातच! ३० कोटींहून अधिकचा निधी निविदांत अडकला अन् यंत्रणाही बंद; स्वच्छ हवेचे उद्दिष्ट अजूनही दूर!

कोल्हापूर शहरातील हवेतील सूक्ष्म धुलिकणांमुळे (PM2.5 व PM10) वाढणारे प्रदूषण रोखण्यासाठी आणि शहरातील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेला (KMC) यंदाच्या वर्षी १७ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. केंद्र सरकारच्या 'राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत' (NCAP) हा निधी देण्यात आला असला, तरी यापूर्वी आलेल्या निधीतील अनेक प्रकल्प व कामे रखडलेली असून काही यंत्रणा बंद पडल्यामुळे कोल्हापूरकरांना स्वच्छ हवा देण्याचे उद्दिष्ट अद्याप अपूर्णच राहिले आहे.

३० कोटींहून अधिकचा निधी निविदांत अडकला; नवीन कामांचे नियोजन रखडले:

उपलब्ध माहितीनुसार, आतापर्यंत राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत मिळालेल्या ३० कोटी रुपयांहून अधिकच्या निधीतून सुचविण्यात आलेली अनेक कामे अद्याप निविदा प्रक्रियेतच अडकलेली आहेत. निविदा प्रक्रिया, तांत्रिक मंजुरी व प्रशासकीय कार्यवाहीतील विलंभामुळे प्रत्यक्ष जमिनीवर कामे सुरू होण्यास उशीर होत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, एकीकडे विविध कामांसाठी निधीचा तुटवडा असल्याचे सांगितले जात असताना, दुसरीकडे उपलब्ध झालेल्या नवीन निधीतून अजून अनेक कामेच सुचविलेली नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

बंद पडलेल्या यंत्रणा, वाहतूक-धूळ प्रदूषण आणि नागरिकांचे आरोग्य:

हवेतील धूळ व प्रदूषण कमी करण्यासाठी उभारण्यात आलेल्या काही यंत्रणा बंद पडणे किंवा त्यांचा नियमित व प्रभावी वापर न होणे, यामुळेही स्वच्छ हवा मोहिमेच्या परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. शहरातील वाढती वाहतूक, रस्त्यांवरील धूळ, बांधकामांचा राडारोडा आणि इतर स्रोत यामुळे हवेतील प्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत असून, त्याचा थेट परिणाम नागरिकांच्या श्वसन व आरोग्यावर होत आहे. निविदा प्रक्रिया तातडीने पूर्ण करून रखडलेली कामे मार्गी लावणे आणि नवीन निधीतील कामांचे नियोजन करून ती वेळेत पूर्ण करणे, हे महापालिकेसमोर मोठे आव्हान ठरले आहे.

 



महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *