पुणे: मध्य भागात दिवाळी खरेदीसाठी नागरिकांची तुफान गर्दी; वाहतूक नियोजन अन् चोऱ्या रोखण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त

पुणे: दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील मध्यवर्ती भागात खरेदीसाठी नागरिकांची तुफान गर्दी उसळली आहे. विशेषतः लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, तुळशीबाग, महात्मा फुले मंडई आणि शनिपार परिसरात खरेदीसाठी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि जिल्हाभरातून नागरिक, प्रामुख्याने महिला मोठ्या संख्येने येत आहेत. या प्रचंड गर्दीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलीस दलाकडून मध्य भागात अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.

सणासुदीच्या काळात गर्दीचा गैरफायदा घेऊन महिलांकडील दागिने, मोबाईल आणि रोकड चोरीला जाण्याच्या घटना घडतात. या पार्श्वभूमीवर स्थानिक पोलिसांसह गुन्हे शाखेची विशेष पथके मध्य भागात साध्या वेषात गस्त घालत आहेत. वाहतूक पोलिसांना मदत करण्यासाठी वाहतूक स्वयंसेवकांचीही (Traffic Volunteers) मदत घेतली जात आहे. गर्दीच्या ठिकाणी कोणताही संशयास्पद गैरप्रकार आढळल्यास चोरट्यांवर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दुकानदारांना आणि व्यावसायिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी पोलिसांना सहकार्य करावे तसेच आपल्या दुकानांसमोर बेकायदेशीर पथारी व्यावसायिकांना बसू देऊ नये, जेणेकरून पादचाऱ्यांना चालण्यासाठी जागा मिळेल आणि गर्दीवर नियंत्रण ठेवणे सोपे होईल.

दरम्यान, पोलिसांचा बंदोबस्त असतानाही रविवारी (१ नोव्हेंबर) खरेदीच्या गर्दीत चोऱ्यांचे प्रकार उघडकीस आले आहेत. शनिपार चौकात दुपारी साडेचारच्या सुमारास एका महिलेच्या पिशवीतून ७ हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबवली. तर दुसऱ्या घटनेत तुळशीबागेत खरेदीसाठी आलेल्या एका महिलेच्या पिशवीतून चोरट्यांनी १४ हजार ७८८ रुपये लांबवले. या दोन्ही घटनांप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या घटनांनंतर पोलिसांनी मध्य भागातील सुरक्षा आणि गस्त अधिक कडक केली असून सणासुदीत नागरिकांनीही गर्दीच्या ठिकाणी आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *