प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरण शिंदेंच्या शिवसेनेला भोवले; माजी महापौर मीनाक्षी शिंदेंचा अखेर पक्षपदाचा राजीनामा, ठाण्याच्या राजकारणात मोठी खळबळ!

ठाणे शहरात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याप्रकरणाला एक महिना पूर्ण झाल्यानंतर ठाण्याच्या राजकारणात प्रचंड खळबळ उडाली आहे. या हत्याप्रकरणात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या (शिंदेसेना) माजी महापौर तथा नेत्या मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. पूर्णेकर कुटुंबीयांनी आणि विरोधकांनी याप्रकरणी मीनाक्षी शिंदे यांच्या अटकेची आक्रमक मागणी करत पोलीस ठाण्यासमोर तीव्र आंदोलने केली होती. वाढत्या दबावामुळे आणि पक्षाची प्रतिमा मलिन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अखेर मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

मीनाक्षी शिंदेंचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भावनिक पत्र:

वाढता वाद आणि पक्षांतर्गत राजकीय ताणतणाव पाहता, मीनाक्षी शिंदे यांनी उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे आपले राजीनामा पत्र सुपूर्द केले. या राजीनाम्याच्या पत्रात त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले आहे की, "ज्या हत्येप्रकरणाशी माझा दूरदूरपर्यंत कोणताही संबंध नाही, त्यामध्ये माझे नाव जाणीवपूर्वक जोडून मला व पक्ष नेतृत्वाला वेठीस धरण्याचे षड्यंत्र रचले जात आहे. माझ्यामुळे पक्षाची किंवा मुख्य नेत्यांची मान खाली जावी किंवा बदनामी व्हावी, ही कल्पनाही मला सहन होत नाही. माझ्या निष्ठेची अशी हीनस्वरूपात पावती मिळल्यामुळे मनाला प्रचंड वेदना झाल्या आहेत, त्यामुळे मी पक्षाच्या महिला आघाडी प्रमुख पदाचा राजीनामा देत आहे."

पोलिसांची चौकशी आणि राजकीय वर्तुळात उमटलेले पडसाद:

या प्रकरणाची गंभीर दखल घेत ठाणे पोलिसांच्या विशेष तपास पथकाने (SIT) राजेंद्र शिंदे यांची सखोल चौकशी केली असून, मीनाक्षी शिंदे यांनाही चौकशीसाठी बोलावले होते. या हत्याकांडामुळे ठाण्याच्या राजकीय वर्तुळात शिवसेना आणि विरोधकांमध्ये तीव्र संघर्षाचे वातावरण निर्माण झाले आहे. एका बाजूला निष्ठावान नेत्यावर अन्याय होत असल्याची चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे या गंभीर प्रकरणामुळे पक्षाची प्रतिमा वाचवण्यासाठी स्थानिक पातळीवर वेगाने पावले उचलली जात असून, या राजीनाम्यामुळे ठाण्याच्या राजकारणात नवीन राजकीय समीकरणे व चर्चांना उधाण आले आहे.

 

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *