नाशिक: सेवानिवृत्तीला अवघे काही तास उरले असताना मनपा आयुक्त लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात; स्वीय सचिव व लेखापालसह तिघे अटकेत"

नाशिक: महाराष्ट्राच्या प्रशासकीय वर्तुळात एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. मालेगाव महानगरपालिकेचे आयुक्त रवींद्र जाधव हे त्यांच्या सरकारी सेवेच्या अखेरीस, म्हणजेच सेवानिवृत्तीला अवघे काही तास शिल्लक असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात अडकले आहेत. लाचखोरीच्या एका गंभीर प्रकरणात नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आयुक्त रवींद्र जाधव यांच्यासह त्यांच्या स्वीय सचिवावर आणि लेखापाल अशा एकूण तिघांवर धडक कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे संपूर्ण राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात एकच गहजब उडाला आहे.

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, एका ठेकेदाराच्या बिलाच्या बदल्यात लाचेची मागणी करण्यात आली होती. १० सप्टेंबर आणि १३ सप्टेंबर रोजी दोन्ही बिलांच्या प्रत्येकी ४ टक्के प्रमाणे एकूण ८० हजार रुपयांच्या लाचेची मागणी ठेकेदाराकडे करण्यात आली होती. त्यानंतर २४ सप्टेंबर रोजी आयुक्त रवींद्र जाधव यांनी तक्रारदाराकडे बिलाची रक्कम बँक खात्यावर जमा झाल्यानंतर लाचेची रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवली होती. तसेच, नीलेश पाटील यांनी केलेल्या लाचेच्या मागणीस १९ ऑक्टोबर रोजी आयुक्त रवींद्र जाधव यांनी प्रत्यक्ष प्रोत्साहन दिल्याचे तपासात समोर आले आहे.

या संपूर्ण प्रकरणाची गोपनीय पडताळणी केल्यानंतर, नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून कारवाई केली. मुंबईच्या दिशेने निघालेले आयुक्त रवींद्र जाधव आणि त्यांचे स्वीय साहाय्यक नीलेश पाटील यांना घोटी टोलनाक्याजवळ ताब्यात घेण्यात आले, तर लेखापाल हरिश डिंबर याला मालेगाव येथून ताब्यात घेत तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाने या तिन्ही आरोपींना पोलिस कोठडी सुनावली आहे.

विशेष म्हणजे, आयुक्त रवींद्र जाधव हे येत्या ३१ ऑक्टोबर रोजी सेवेतून सेवानिवृत्त होणार होते. निवृत्तीला अवघे दोन दिवस उरले असताना आणि अगदी त्याच दिवशी मालेगाव महापालिकेची महासभा सुरू असताना घडलेल्या या कारवाईमुळे संपूर्ण शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधीक्षक सौ. स्वाती पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक सचिन साळुंखे व त्यांच्या पथकाने ही यशस्वी कारवाई पार पाडली आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *