पुणे: धायरीत आरएमसी प्लांटवर कारवाईचा दिखावा..! फक्त पत्र्यांची शेड पाडली, मुख्य यंत्रणेला हात नाहीच

पुणे: शहरातील अनधिकृत आरएमसी (रेडी मिक्स काँक्रीट) प्लांट्सचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला असून, प्रशासनाच्या कारवाईबद्दल गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत आणि विशेषतः धायरी तसेच वडगाव खुर्द परिसरातील 'ग्रीन बेल्ट' आणि नदीकाठच्या भागात अनेक अनधिकृत आरएमसी प्लांट्सचा सुळसुळाट झाला आहे. या प्लांट्समुळे मोठ्या प्रमाणावर उडणारी धूळ, प्रदूषण आणि वाढत्या जड वाहनांच्या वावरामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून आरोग्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. स्थानिक रहिवासी आणि नागरिकांच्या तीव्र रोषानांतर प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येतो, मात्र प्रत्यक्षात ही कारवाई केवळ दिखावा ठरत असल्याचे समोर आले आहे.

नुकतीच धायरी परिसरातील अनधिकृत आरएमसी प्लांट्सवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागामार्फत कारवाई हाती घेण्यात आली. मात्र, ही कारवाई अत्यंत संशयास्पद आणि मोजक्या स्वरूपात पार पडली. प्रशासनाने कारवाईच्या नावाखाली केवळ प्लांटच्या बाजूला असलेल्या काही पत्रांच्या शेड्स आणि किरकोळ भाग पाडण्याचे नाटक केले, तर प्लांटमधील मुख्य यंत्रणा, सिमेंट मिक्सर आणि इतर महत्त्वाची अवजारे पूर्णपणे सुरक्षित ठेवली गेली. मुख्य यंत्रणेला हातच लावला नसल्यामुळे हे प्लांट अवघ्या काही तासांत पुन्हा पूर्ववत सुरू होऊ शकतात, अशी भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे.

पुणे महानगरपालिका क्षेत्रात शंभर ते सव्वाशेहून अधिक आरएमसी प्लांट्स विनापरवाना सुरू असून, त्यापैकी एकाही प्लांटने महापालिकेची कायदेशीर परवानगी घेतलेली नाही. पर्यावरण निकषांचे उल्लंघन होत असताना आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असतानाही राजकीय दबावामुळे किंवा प्रशासकीय दुर्लक्षामुळे कारवाई केवळ कागदोपत्री आणि दिखाव्यापुर मर्यादित राहत असल्याचा आरोप संतप्त नागरिकांनी केला आहे. केवळ पत्र्यांची शेड पाडण्याच्या या तकलादू कारवाईमुळे नागरिकांमधील संताप आणखी वाढला असून, जर या अनधिकृत प्लांट्सवर कडक आणि पूर्णपणे निष्कासनाची कायदेशीर कारवाई केली नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *