नाशिक: रक्ताचा थरार! मुंबई-आग्रा महामार्गावर ओव्हरब्रिजवर कंटेनरच्या धडकेत ३० वर्षीय महिला वकिलाचा जागीच मृत्यू

नाशिक: संसाराची जबाबदारी सांभाळत, चिमुकल्या मुलाचे संगोपन करत आणि पतीला व्यवसायात हातभार लावत स्वतःच्या कर्तृत्वावर वकिली क्षेत्रात ओळख निर्माण करणाऱ्या शीतल दीपक नरुले (वय ३१) यांचा शुक्रवारी (दि. २३) सकाळी झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. ट्रकच्या धडकेत चाकाखाली सापडून त्यांचा जागीच मृत्यू झाला. स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न साकार होत असतानाच काळाने घातलेल्या घावामुळे नरुले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
शुक्रवारी (दि. २३) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास सत्यम मंगल कार्यालयासमोरील उड्डाणपुलावर द्वारकेकडे जाणाऱ्या ट्रक ट्रेलरने (एमएच ४६ सीएल ३९०२) पाठीमागून शीतल नरुले यांच्या दुचाकीला (एमएच १५ एफएल ९५९०) जोरदार धडक दिली. कंटेनरचे चाक डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अंबड पोलिसांनी कंटेनर जप्त करून गुन्हा दाखल केला आहे. शीतल यांच्या पश्चात पती दीपक, आठ वर्षांचा मुलगा, आई-वडील आणि सास-सासरे असा परिवार आहे.

संसार सांभाळत वकिली
सिडकोतील फडोळ मळा, बुरकुले हॉलमागे राहणाऱ्या शीतल यांचे पती दीपक हे रिअल इस्टेट व्यवसायात कार्यरत आहेत. त्यांच्या कामातील कागदपत्रे तयार करणे आणि नोंदणीच्या प्रक्रियेत मदत करताना शीतल यांना कायद्याच्या क्षेत्राची गोडी लागली. संसार आणि घरकाम सांभाळत असतानाच पतीने त्यांना कायद्याचे शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिले. सन २०२४ मध्ये कायद्याची पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी कन्व्हेयन्सिंग आणि जनरल प्रॅक्टिस सुरू केली. काही महिन्यांपूर्वीच पाथर्डी फाटा येथील दामोदर चौकात त्यांनी स्वतःचे कार्यालय सुरू केले होते. या नव्या सुरुवातीने त्यांच्या स्वप्नांना नवी दिशा मिळाली होती. चिमुकल्या मुलाचे संगोपन, वकिलीची प्रॅक्टिस आणि पतीला मदत, असा त्यांचा दिनक्रम होता. मात्र, कंटेनरच्या धडकेत त्यांचा जीवनप्रवास अचानक संपला. त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे कुटुंबीय, नातेवाईक, परिसरातील नागरिक आणि वकील भगिनींमध्ये शोककळा पसरली आहे.

'आई, तू परत केव्हा येणार?'
शीतल यांचा आठ वर्षांचा मुलगा सेंट फ्रान्सिस शाळेत इयत्ता तिसरीत शिकतो. आई घराबाहेर पडताना तो निरागसपणे, 'आई, तू परत केव्हा येणार?' असा प्रश्न विचारायचा. आई पुन्हा घरी येईल, आपल्याला भेटेल, या अपेक्षेने तिची वाट पाहणाऱ्या या चिमुकल्याला आता आईच्या मायेचा सहवास कायमचा मुकला आहे. मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी संसार आणि करिअरची दुहेरी जबाबदारी सांभाळणाऱ्या शीतल यांच्या जाण्याने त्याच्या आयुष्यात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. स्वतःचे कार्यालय थाटून वकिली क्षेत्रात पुढे जाण्याचे शीतल यांचे स्वप्न अपघाताने हिरावून घेतले.

अभाव दिशादर्शकांचा
इंदिरानगर बोगद्यापासून गरवारे चौकापर्यंत दुचाकींना प्रवेश असला, तरी दिशादर्शक आणि वेगमर्यादेचे फलक नाहीत. रात्री पथदीप बंद असल्याने अंधारात वाहनचालकांची धांदल उडते. काही ठिकाणी प्रवेशबंदीची प्रभावी अंमलबजावणीही होत नाही. राणेनगर, अश्विननगर, हॉटेल सेवन हेवन, एक्स्प्रेस इन आणि स्टेट बँक चौक येथे उड्डाणपुलावरून सर्व्हिस रोडवर प्रवेश करताना तसेच बाहेर पडताना दिशादर्शक फलक नाही. अनेक ठिकाणी दुभाजक नसल्याने वाहनचालकांचा गोंधळ उडून अपघात होतात. या ठिकाणी सूचना फलक, दुभाजक आणि सुरक्षित प्रवेश-निर्गमन मार्गांची व्यवस्था करणे गरजेचे आहे.

वेगमर्यादेचे फलक कुठे?
दुचाकींना प्रवेशबंदी असलेल्या ठिकाणी प्रभावी पोलिस बंदोबस्त नसल्याची तक्रार आहे.
नियमभंग रोखण्यासाठी नियमित तपासणी, प्रवेशबंदीची स्पष्ट सूचना आणि नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाई आवश्यक आहे.

पोलिस बंदोबस्ताचा अभाव
मुंबई-आग्रा महामार्गावरील राणेनगर उड्डाणपुलावर कंटेनर ट्रेलरच्या धडकेत वकील महिलेचा मृत्यू झाल्याने वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गरवारे चौक ते द्वारका दरम्यान वर्षभरात १५ हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून, आवश्यक उपाययोजनांच्या अभावामुळे हा उड्डाणपूल मृत्यूचा सापळा ठरत असल्याची संतप्त भावना व्यक्त होत आहे.

वर्षभरात पंधराहून अधिक मृत्यू
मुंबई-आग्रा महामार्गावरील राणेनगर उड्डाणपुलावर कंटेनर ट्रेलरच्या धडकेत वकील महिलेचा मृत्यू झाल्याने वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गरवारे चौक ते द्वारका दरम्यान वर्षभरात १५ हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत असून, आवश्यक उपाययोजनांच्या अभावामुळे हा उड्डाणपूल मृत्यूचा सापळा ठरत असल्याची संतप्त भावना व्यक्त होत आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *