पुणे: पदवीधर मतदारसंघ निवडणूक विजयाचा ठाम विश्वास व्यक्त करत उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव आणि स्मिता जाधव यांनी बजावला मतदानाचा हक्क

पुणे: विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी आज (दि. २३) सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून दुपारी ४ वाजेपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. पदवीधर मतदारसंघासाठी ४७ तर शिक्षक मतदारसंघासाठी ३० उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत पुणे पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख जाधव आणि महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव यांनी आपला मतदानाचा हक्क बजावून विजयाचा ठाम विश्वास व्यक्त केला.

कोल्हापूरसारखाच गुलाल २७ तारखेला उधळणार

मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावल्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख जाधव यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, "या निवडणुकीचा खरा केंद्रबिंदू पदवीधर मतदार आहेत. सुशिक्षित आणि सुजाण असलेल्या पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला ही संधी मिळाली असून माझ्या विजयाची मला पूर्ण खात्री आहे. सध्या वाढती महागाई आणि बेरोजगारीचे चटके सर्वसामान्य व पदवीधरांना बसत आहेत, त्यामुळे सुजाण मतदार योग्य तोच निर्णय घेईल. प्रचाराच्या सुरुवातीलाच मला शरद पवार साहेबांचा आशीर्वाद मिळाला होता. कोल्हापूरमध्ये जसा विजयाचा गुलाल उधळला गेला, तसाच गुलाल आता निकालाच्या दिवशी म्हणजेच २७ तारखेला पुन्हा उधळला जाईल." दरम्यान, मतदारांनी दुपारच्या उन्हाचा त्रास टाळण्यासाठी शक्यतो सकाळीच मतदान केंद्रावर येऊन मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

मतदान केवळ हक्क नव्हे, जबाबदारी
दुसऱ्या बाजूला महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव यांनीही मतदान केंद्रावर उपस्थित राहून मतदानाचा हक्क बजावला. मतदान केल्यानंतर त्यांनी सर्व मतदारांना कर्तव्य बजावण्याचे आवाहन केले. त्या म्हणाल्या, "आजचा दिवस हा लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. मतदान करणे हा केवळ आपला हक्क नसून, ती आपली सर्वांची जबाबदारी आहे. मी माझ्या सर्व पदवीधर बंधू-भगिनींना आवाहन करते की, तुम्ही सर्वांनी मोठ्या संख्येने घराबाहेर पडून मतदान केंद्रावर या आणि आपला हक्क बजावा. आपले एक मत लोकशाही व्यवस्थेला अधिक बळकट करू शकते, त्यामुळे प्रत्येकाने आपले अमूल्य मत नक्की नोंदवले पाहिजे. दरम्यान, दोन्ही प्रमुख उमेदवारांनी मतदानाचा हक्क बजावत पदवीधरांच्या प्रश्नांवर लक्ष वेधल्याने या निवडणुकीतील चुरस अधिक रंगतदार ठरत असून मतदारांचा प्रतिसाद कोणाच्या पारड्यात झुकणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *