मुंबई: आयआयटी मुंबई साहिल मृत्यू प्रकरण आई-वडिलांसह आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात, संचालकांच्या निवासस्थानाबाहेर विद्यार्थ्यांचे तीव्र आंदोलन!

मुंबई: आयआयटी बॉम्बे येथील विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या दुर्दैवी मृत्यूस एक महिना पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, त्याला श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि या प्रकरणात अद्यापही कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे बोर्ड ऑफ गव्हर्नन्सच्या अध्यक्षांना भेटण्यासाठी आयआयटी कॅम्पसमध्ये पोहोचलेल्या साहिलच्या आई-वडिलांना मुंबई पोलिसांनी रविवारी दुपारी ताब्यात घेतल्याची खळबळजनक घटना घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून न्याय मागण्यासाठी साखळी उपोषणाला बसलेल्या २२ विद्यार्थ्यांसह प्रवेशद्वारावर जमलेल्या अनेक कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी जबरदस्तीने ताब्यात घेतले. या पोलीस कारवाईदरम्यान काही विद्यार्थ्यांना दुखापत झाली आणि त्यांचे कपडे फाटल्याचा गंभीर आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या सर्वांना रविवारी सायंकाळी सोडून दिले. मात्र, अत्यंत शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना व पालकांना अशा प्रकारे ताब्यात घेतल्याच्या निषेधार्थ संतप्त विद्यार्थ्यांनी संचालक डॉ. शिरिष केदारे यांच्या आयआयटी परिसरातील निवासस्थानाबाहेर सायंकाळी पुन्हा जोरदार धरणे आंदोलन सुरू केले. या संपूर्ण कारवाईदरम्यान पोलिसांनी गेल्या महिनाभरापासून आयआयटीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सुरू असलेले 'जस्टिस कॉर्नर' हे आंदोलनस्थळही बळाचा वापर करून हटवले.

काय आहे प्रकरण? १८ सप्टेंबर रोजी साहिल वाकोडे याने आयआयटी मुंबईतील स्वतःच्या वसतिगृहात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मृत साहिलच्या कुटुंबीयांनी प्रा. सूर्यनारायण डुल्ला यांच्यावर जातीयवादी छळ केल्याचा अत्यंत गंभीर आरोप केला असून, त्यांच्या तत्काळ निलंबन व अटकेची मागणी लावून धरली आहे. मात्र, घटनेला एक महिना उलटून गेला तरीही प्रा. डुल्ला यांच्यावर कोणतीही कारवाई न झाल्याने न्याय मिळण्याच्या मागणीसाठी रविवारी सकाळी विविध विद्यार्थी संघटनांचे आणि आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते मोठ्या संख्येने आयआयटीच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर गोळा झाले होते. यावेळी त्यांनी सखोल चौकशी व कारवाईसाठी जोरदार घोषणाबाजी केली.

पालकांची भेट नाकारली व पोलिसांची कारवाई: साहिलचे आईवडील सोनाली आणि रवींद्र वाकोडे हे रविवारी बोर्ड ऑफ गव्हर्नन्सच्या अध्यक्षांची प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी आले होते. प्रशासनाकडून आधी वेळ देऊनही, ऐनवेळी प्रकृती बरी नसल्याचे कारण देत अध्यक्षांनी भेट नाकारली. त्यामुळे हतबल झालेल्या पालकांनी कुलसचिवांना (रजिस्ट्रार) आपले निवेदन सुपूर्द केले. त्यानंतर लगेचच पोलिसांनी साहिलच्या पालकांना व अन्य आंदोलकांना ताब्यात घेऊन आझाद मैदान तसेच साकीनाका आणि पवई पोलीस ठाण्यात नेले. पोलीस ठाण्यात नेल्यानंतरही विद्यार्थ्यांनी निषेध म्हणून जोरदार घोषणाबाजी केली.

खासदार वर्षा गायकवाड यांची भेट व रोष: दरम्यान, साहिलच्या मृत्यूला महिना उलटूनही दोषींवर कारवाई न झाल्याने मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा तथा खासदार वर्षा गायकवाड यांनी साहिलच्या पालकांसह आयआयटी मुंबईला भेट दिली. गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने प्रशासनाला निवेदन देऊन संबंधित प्राध्यापकाला तात्काळ अटक करण्याची मागणी केली व साहिलला श्रद्धांजली अर्पण केली. या प्रकरणी न्याय मिळेपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी व नेत्यांनी दिला आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

इतर

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *