कोल्हापूर गणेश विसर्जन मिरवणुकीचे संपूर्ण रेकॉर्डिंग होणार! ‘टायमर सिस्टीम’सह तगडा पोलिस बंदोबस्त तैनात, मोठ्या मंडळांच्या दादागिरीला चाप

कोल्हापुर: गणेश विसर्जन मिरवणूक अत्यंत सुरक्षित, सुरळीत आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. विसर्जन मिरवणुकीदरम्यान कोणतीही गैरसोय होऊ नये किंवा मिरवणूक अनावश्यक रेंगाळू नये, यासाठी प्रशासनाने महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. महाद्वार रोड आणि राजारामपुरीसह प्रमुख मार्गांवर ‘टायमर सिग्नल’ची प्रभावी व्यवस्था करण्यात आली असून, प्रत्येक गणेश मंडळाला एका ठिकाणी केवळ २० मिनिटेच थांबण्याची सक्ती असणार आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या किंवा मिरवणूक जाणीवपूर्वक रेंगाळणाऱ्या मंडळांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.

मिरवणुकीचे संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग आणि कडक सुरक्षा: गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच नियमांचे पालन होते की नाही हे पाहण्यासाठी संपूर्ण मिरवणुकीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जाणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे. वाद किंवा ताणतणावाच्या प्रसंगी संबंधित कर्मचाऱ्यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलावून घ्यावे, अशा स्पष्ट सूचना पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. भाविकांमधील गर्दी आणि संभाव्य चेंगराचेंगरी टाळण्यासाठी सर्व महत्त्वाच्या ‘मिक्सिंग पॉईंट्स’वर अनुभवी आणि उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. शहरात सुमारे एक हजार इतका तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, प्रत्येक हालचालीवर कसून लक्ष ठेवले जात आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची थेट नेमणूक व आधुनिक यंत्रणा: विसर्जन मिरवणूक सुरळीत पार पाडण्यासाठी विविध चौकांमध्ये उपअधीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये मिरजकर तिकटी चौकात उपअधीक्षक सुवर्णा पत्की, बिनखांबी गणेश मंदिर चौकात उपअधीक्षक प्रिया पाटील, पापाची तिकटी येथे गृह उपअधीक्षक राजेंद्र मस्के, तर इराणी खण आणि पर्यायी मार्गांवमदर इतर वरिष्ठ अधिकारी आपली सेवा बजावणार आहेत. या अधिकाऱ्यांसोबतच पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि जलद कृती दल (QRT) कार्यरत असणार आहे.

तसेच सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष, नॉइज लेव्हल मीटरच्या (Noise Level Meter) माध्यमातून साऊंड सिस्टीमच्या आवाजाचे नमुने तपासणे आणि टायमर सिग्नलद्वारे संपूर्ण मिरवणुकीवर नियंत्रण ठेवण्याचे विशेष प्रशिक्षण पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आले आहे. विनापरवाना उडणारे ड्रोन रोखण्यासाठी ‘अँटी ड्रोन गन’ची प्रात्यक्षिकेही पार पडली असून, ‘दिग्गज’ मंडळांची कोणतीही दादागिरी यापुढे खपवून घेतली जाणार नाही, असा कडक इशारा पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिला आहे.

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *