बीड: एसटी कर्मचाऱ्यांमध्ये मोठी खळबळ! बीडमधील आष्टी आगाराच्या विश्रांती कक्षात ४६ वर्षीय एसटी चालकाने संपवले जीवन

बीड: आष्टी राज्य परिवहन महामंडळाच्या (MSRTC) आगारात चालक म्हणून सेवा बजावणाऱ्या एका ४६ वर्षीय कर्मचाऱ्याने बसस्थानकातील विश्रांती कक्षात गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना आज, शनिवारी (दि. १२) पहाटे समोर आली आहे. अन्सार हबीब शेख (वय ४६, रा. साबलखेड, ता. आष्टी) असे मृत चालकाचे नाव आहे. बसस्थानकाच्या आवारातच कर्मचाऱ्याने असे टोकाचे पाऊल उचलल्याने एसटी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

विश्रांती कक्षाचा दरवाजा आतून लॉक केला
मिळालेल्या माहितीनुसार, अन्सार शेख हे २०१० पासून आष्टी आगारात चालक म्हणून प्रामाणिकपणे सेवा बजावत होते. शुक्रवारी रात्री ते नेहमीप्रमाणे बसस्थानकातील चालक व वाहकांसाठी असलेल्या विश्रांती कक्षात गेले आणि त्यांनी दरवाजा आतून बंद करून घेतला. शनिवारी पहाटेच्या सुमारास नाशिक-तुळजापूर मार्गावरील बसचे चालक गाडी घेऊन आष्टी बसस्थानकात आले. काही वेळ विश्रांती घेण्यासाठी ते कक्षाजवळ गेले असता दरवाजा आतून बंद असल्याचे आढळले. वारंवार दरवाजा ठोठावूनही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

खिडकीतून पाहताच समोर आला थरार
संशय आल्याने संबंधित चालकाने तात्काळ नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांना ही बाब सांगितली. त्यानंतर उपस्थित कर्मचाऱ्यांनी विश्रांती कक्षाच्या खिडकीतून डोकावून पाहिले असता, अन्सार शेख यांचा मृतदेह छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत लटकताना दिसून आला. हा प्रकार समोर येताच बसस्थानक परिसरात एकच गोंधळ उडाला.

पोलिसांकडून पंचनामा; कुटुंबाचा आक्रोश
घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार अशोक तांबे, परमेश्वर तागड आणि विलास गुंडाळे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह खाली उतरवला आणि उत्तरीय तपासणीसाठी (Post-Mortem) आष्टी ग्रामीण रुग्णालयात पाठवला. अन्सार शेख यांनी हे टोकाचे पाऊल नेमके कोणत्या कारणास्तव उचलले, कौटुंबिक तणाव होता की अन्य काही कारण, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मयत अन्सार शेख यांच्या पश्चात वृद्ध आई, पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. घरातील कर्ता माणूस अचानक निघून गेल्याने साबलखेड परिसरावर शोककळा पसरली असून शेख कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *