अमरावतीत: ब्रेकअपचा बदला घेण्यासाठी भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी १७ वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून निर्घृण हत्या!

अमरावतीः स्थानिक रवी नगर चौकात गुरुवारी दुपारी १२.४५ च्या सुमारास एका १७ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीची भरदिवसा निघृण हत्या करण्यात आल्याने संपूर्ण शहर हादरले आहे. एकतर्फी प्रेमाच्या विकृत मानसिकतेतून आणि ब्रेकअपच्या संतापातून माथेफिरू तरुणाने महाविद्यालयीन विद्यार्थी शर्वरी हिच्यावर चाकूने सपासप वार करून तिची अत्यंत क्रूरपणे हत्या केली.

रवी नगर येथील गजबजलेल्या चौकात घडलेल्या या थरारक घटनेने नागरिक भयभीत झाले आहेत.
आरोपीचे गेल्या दोन वर्षांपासून मृतक तरुणीशी संबंध असल्याचा संशय असून, अलीकडेच तिने त्याच्याशी संबंध तोडल्याने (ब्रेकअप केल्याने) तो प्रचंड संतापला होता. गुरुवारी दुपारी शर्वरी आपल्या दुचाकीने ब्रिजलाल बियाणी महाविद्यालयात जात असताना, मूर्तिजापूर येथील रहिवासी असलेल्या नराधम आरोपीने तिचा पाठलाग केला. रवी नगर चौकात त्यांच्यात वाद झाल्यानंतर आरोपीने शर्वरीच्या मानेवर, पोटावर आणि छातीवर वार केले. जिवाच्या आकांताने प्राण वाचवण्यासाठी तिने निकराचा प्रतिकार केला, यादरम्यान झटापटीत आरोपीचा मोबाईल आणि पाकीट घटनास्थळीच पडले. मात्र, निर्दयी हल्लेखोराने तिला रक्ताच्या थारोळ्यात पाडून घटनास्थळावरून पोबारा केला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त श्याम घुगे, राजापेठचे ठाणेदार संदीप चव्हाण, गुन्हे शाखाप्रमुख अतुल वर आणि दिनेश दहातोंडे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शर्वरीला तातडीने बडनेरा रोडवरील एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या भीषण घटनेमुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, राजापेठ पोलीस आणि गुन्हे शाखेची पथके आरोपीच्या मुसक्या आवळण्यासाठी रवाना झाली आहेत.

सूचना: ही बातमी उपलब्ध माहिती व अधिकृत स्रोतांच्या आधारे प्रकाशित करण्यात आली आहे. अधिकृत तपास व पुढील घडामोडींनुसार माहितीमध्ये बदल होऊ शकतो.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *