वेधशाळेचा चिंता वाढविणारा अंदाज! एल-निनोचे संकट गडद, पुढचे काही दिवस पाऊस नाहीच?

नागपूर: मान्सूनवर 'एल-निनो'चे संकट अधिक गडद होत चालले आहे. ऑगस्ट महिन्याच्या उरलेल्या पाच दिवसांतही मान्सून कमकुवतच राहणार असून जोदस्त पावसाची कोणतीही शक्यता नाही, असा हवामान वेधशाळेचा अंदाज आल्यामुळे चिंता आणखी वाढली आहे. त्यामुळे या कोरड्या व दमट वातावरणात केवळ हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरींवरच समाधान मानावे लागेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

अगस्त महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू असला, तरी आतापर्यंत विदर्भासह नागपूरमध्ये हवासा व समाधानकारक पाऊस झालेला नाही. नागपूरसह संपूर्ण विदर्भात २५ पैकी मोजक्याच दिवशी हलक्या ते मध्यम सरींचा पाऊस बरसला आहे. यामध्ये केवळ गोंदिया व भंडारा जिल्ह्यात दिलासादायक पावसाने हजेरी लावली असून, इतर जिल्ह्यांमधील बळीराजाला आणि नागरिकांना अद्यापही जोरदार पावसाची मोठी प्रतीक्षा लागून राहिली आहे. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जोरदार बरसून पावसाची तूट काही प्रमाणात भरून काढली होती, परंतु ऑगस्ट महिन्यात पावसाने पूर्णपणे निराशा केली आहे.

विदर्भातील जिल्ह्यांची आतापर्यंतची पावसाची आकडेवारी (मिलीमीटरमध्ये):

  • गोंदिया: ८४३.९ मिमी

  • गडचिरोली: ८०४.० मिमी

  • भंडारा: ६०९.७ मिमी

  • यवतमाळ: ५४२.३ मिमी

  • चंद्रपूर: ५०२.० मिमी

  • वर्धा: ४४६.४ मिमी

  • वाशिम: ४३२.४ मिमी

  • बुलडाणा: ४३०.८ मिमी

  • नागपूर: ४१९.१ मिमी

  • अमरावती: ३९६.६ मिमी

  • अकोला: ३६६.४ मिमी

सोमवारी अमरावतीत काही काळ मध्यम स्वरूपाच्या सरी बरसल्या. दुसरीकडे भंडारा व गोंदिया जिल्ह्यात मंगळवारपर्यंत पावसाची चांगली उपस्थिती पाहायला मिळाली. भंडाऱ्यात मंगळवार सकाळपर्यंत २० मिमी, तर गोंदियात सकाळी २५ आणि सायंकाळपर्यंत १२ मिमी पावसाची नोंद झाली. अमरावतीतही सकाळच्या सुमारास १४.८ मिमी पावसाची नोंद झाली असली, तरी दिवसभर आकाशात ढग शांत राहिले. इतर जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाची उपस्थिती अत्यंत नगण्य राहिली आहे.

नागपूर जिल्ह्याची तुट ३५ टक्क्यांवर, सप्टेंबर महिन्याची स्थितीही निराशाजनक?

जुलैच्या शेवटी पावसाचे प्रमाण सरासरीच्या जवळ आले होते, मात्र ऑगस्ट महिन्यातील कोरड्या वातावरणामुळे नागपूर जिल्ह्याची पावसाची तूट थेट ३५ टक्क्यांवर जाऊन पोहोचली आहे. तसेच संपूर्ण विदर्भातील पावसाचा बॅकलॉग (तूट) ३० टक्क्यांच्या वर गेला आहे. हवामान वेधशाळेचे अधिकारी जरी उघडपणे बोलत नसले, तरी आगामी सप्टेंबर महिन्यातही पावसाची स्थिती निराशाजनकच राहण्याची शक्यता बळावली आहे. येत्या काळात एल-निनो प्रणाली अधिक मजबूत होणार असून, देशात पाऊस आणणारी 'आयओडी' (IOD) प्रणाली देखील कमकुवत होण्याची चिन्हे दिसत आहेत, ज्यामुळे चिंता अधिक वाढली आहे.



शहर

महाराष्ट्र

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *