मुंबई: मानखुर्दमध्ये बेस्ट बसचा भीषण अपघात; भरधाव बस थेट दुभाजकावर धडकल्याने ६५ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू

मुंबई: मानखुर्द परिसरात सोमवारी सकाळी बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. सायन-पनवेल महामार्गावरील विश्वकर्मा रुग्णालयासमोर मार्ग क्रमांक ५०१ ची बेस्ट बस रस्त्यावरील दुभाजकावर (डिव्हायडरवर) जोरदार धडकली. या अपघातात दुभाजकाजवळ उभ्या असलेल्या एका ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला असून, चालक, वाहक आणि प्रवाशांसह अनेक जण जखमी झाले आहेत.

ही घटना सोमवारी सकाळी सुमारे ९.१४ वाजण्याच्या सुमारास घडली. मानखुर्द परिसरातून जाणारी रूट क्रमांक ५०१ ची बेस्ट बस सायन-पनवेल महामार्गावरून जात असताना अचानक चालकाचे नियंत्रण सुटले आणि ती रस्त्याच्या दुभाजकावर जाऊन आदळली. धडक इतकी जोरदार होती की, दुभाजकाजवळ उभे असलेले भास्कर रावसाहेब पांडे (वय ६५) हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने त्यांना तात्काळ घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.

या अपघातात बसचे कर्मचारीही जखमी झाले आहेत. बस चालक बनवारी श्रीराम प्रसाद शर्मा (वय ५१) आणि कंडक्टर वैभव वाघमारे (वय ४१) अशी जखमी कर्मचाऱ्यांची नावे आहेत. दोघांवरही राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. याशिवाय या अपघातात इतर काही प्रवासीही जखमी झाले असून त्यांच्यावर इतर रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.

सकाळच्या व्यस्त वेळेत हा अपघात घडल्यामुळे सायन-पनवेल महामार्गावरील मानखुर्द मेट्रो स्टेशनखाली वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली होती आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मुंबई वाहतूक पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त बस बाजूला केली आणि खोळंबलेली वाहतूक पूर्ववत केली. बेस्ट बसच्या वाढत्या अपघातांमुळे मुंबईतील प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *