मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या अडचणीत मोठी वाढ! १० वर्षांपूर्वीच्या शाळा व शिक्षक मारहाण प्रकरणात सत्र न्यायालयाकडून आरोपनिश्चिती!

मुंबईच्या महापौर रितू तावडे (Ritu Tawade) यांच्या अडचणींमध्ये मोठी वाढ झाली आहे. सुमारे १० वर्षांपूर्वी म्हणजेच २०१६ मध्ये एका शाळेत घुसून शिक्षकांना मारहाण करणे व बेकायदेशीर जमाव जमवल्याच्या आरोपांशी संबंधित प्रकरणात मुंबई सत्र न्यायालयाने सोमवारी (२ नोव्हेंबर) महापौर रितू तावडे यांच्यासह अन्य आरोपींविरोधात आरोपनिश्चिती (Charges Framed) केली आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे महापौर तावडे यांच्यासमोरील कायदेशीर आणि राजकीय पेच अधिक गडद झाला असून आता या प्रकरणात रीतसर खटल्याची (Trial) सुनावणी सुरू होणार आहे.

नेमके काय आहे १० वर्षे जुने प्रकरण?:

प्रकरणातील सविस्तर माहितीनुसार, ही घटना २९ जुलै २०१६ रोजी सांताक्रूझ (पूर्व) येथील वाकोला, शास्त्रीनगर भागातील महापालिकेच्या उर्दू माध्यम शाळेत घडली होती. शाळेतील कर्करोगग्रस्त शिक्षिका शाहीन खान यांची अचानक बीकेसी (BKC) येथील दुसऱ्या शाळेत बदली करण्यात आली होती. या बदलीला विरोध दर्शवण्यासाठी आणि व्यवस्थापनाला जाब विचारण्यासाठी रितू तावडे यांच्यासह इतर सहा जण शाळेच्या आवारात घुसले होते.

मुख्याध्यापिका शरीफा मोमीन यांनी दाखल केलेल्या फिर्यादीनुसार, शाळा व्यवस्थापनाशी हुज्जत घालत असताना आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून मुख्यध्यापिका आणि इतर कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. तसेच, वाद विकोपाला गेल्यानंतर तेथील दोन शिक्षक मोहम्मद याकुब राहीद आणि नदीम अहमद शेख यांना कानाखाली मारून धक्काबुक्की व मारहाण केल्याचा गंभीर आरोप तावडे यांच्यावर आहे. याप्रकरणी ११ ऑगस्ट २०१६ रोजी वाकोला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

न्यायालयाची कडक भूमिका आणि यापूर्वीचा दंड:

या प्रकरणातून दोषमुक्त (Discharge) करण्यासाठी महापौर रितू तावडे यांनी अर्ज केला होता, मात्र प्रत्यक्षदर्शी शिक्षक आणि साक्षीदारांच्या जबाबांमध्ये तावडे यांचे नाव थेट मारहाण करणाऱ्या व्यक्ती म्हणून नमूद असल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने मार्च महिन्यातच त्यांचा अर्ज फेटाळला होता.

त्यानंतरही तावडे सुनावणीस गैरहजर राहिल्याने सत्र न्यायालयाने त्यांना अनुक्रमे ३०० रुपये आणि १,००० रुपयांचा दंड ठोठावून पुढील सुनावणीस उपस्थित न राहिल्यास जामीन रद्द करण्याचा आणि वॉरंट जारी करण्याचा इशारा दिला होता. अखेर तावडे न्यायालयात हजर झाल्यानंतर न्यायालयाने त्यांच्याविरोधात बेकायदेशीर जमाव जमवणे आणि मारहाण करण्याच्या विविध कलमांखाली आरोप निश्चित केले आहेत. आरोपनिश्चिती पूर्ण झाल्यामुळे आता सरकारी पक्षाला आपले पुरावे आणि साक्षीदार सादर करावे लागणार आहेत.

 

 



शहर

महाराष्ट्र

गुन्हा

राजकीय

विडियो गॅलेरी

देश विदेश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *